मुंबईत नाईट व्हिजन कॅमेरे हवेत; ठाकरे सेनेच्या सरदेसाई यांची मागणी

मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्काॅटलॅडच्या पोलिसांशी होत होती. मात्र गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.
वरुण सरदेसाई
वरुण सरदेसाई संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्काॅटलॅडच्या पोलिसांशी होत होती. मात्र गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी नाईट व्हिजन कॅमेरा बसवण्यात यावेत, ठिकठिकाणी पोलीस बीटमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बुधवारी विधान सभेत केली. 

सन २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारच्या विविध विभागातील मागण्या वरील चर्चेत सहभागी होत वरुण सरदेसाई यांनी आपले मत व्यक्त केले. 

कलिना विधान सभा मतदार संघात ९० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. मात्र झोपडपट्टीतील नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. श्रीमंतांच्या घरात चोरी झाली तर आरोपीच्या काही तासांत मुसक्या आवळल्या जातात. मात्र गरीबांच्या घरी चोरी झाली तर चोरच सापडत नाही. ७० वर्षीय महिलेच्या घरी ६ जानेवारी २०२५ मध्ये चोरी झाली. आज तीन महिने उलटले तरी चोराचा पत्ता नाही. कलिना विधान सभा मतदार संघात पोलीस बीट आहेत. मात्र त्या पोलीस बीट मध्ये पोलीसच नाही. पोलीस बीट मध्ये गर्दुल्ले बसलेले असतात. मुंबईला सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण मुंबईत नाईट व्हिजन कॅमेरा बसवणे गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले.

खारफुटी परिसरात प्रकल्प उभारा - मंदा म्हात्रे

मुंबईसाठी मॅग्रोजची झाडे महत्वपूर्ण आहे. मात्र बोरिवली मॅग्रोजवर डेब्रिज कचरा टाकला जातो. यामुळे मॅग्रोजना धोका निर्माण झाला आहे. मॅग्रोज परिसरात असलेल्या शासकीय जागेवर वेस्ट टू एनर्जी प्लांट उभारा, अशी मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहात केली. नाईट व्हिजन कॅमेरा बसवणे गरजेचे तर आहे. परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्हिडिओ शूटिंग साठवण्याची क्षमता ६० दिवसांची करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in