

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाच्या जुन्या बॉईज हॉस्टेलमध्ये स्वतःला प्रथम वर्षाचा एमबीबीएस विद्यार्थी असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. नीट (NEET) परीक्षेची बनावट गुणपत्रिका सादर करून त्याने वसतिगृहात प्रवेश मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जे. जे. मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं?
फैजल आमिरुद्दीन शेख (२१), मूळ रहिवासी - उत्तर प्रदेश, असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या एक महिन्यापासून सर जे. जे. रुग्णालयाच्या जुन्या बॉईज हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. प्रत्यक्षात नीट परीक्षेत त्याला केवळ ९० गुण मिळाले होते. मात्र, त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ५१४ गुण मिळाल्याचे दाखवत एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याचा दावा केला. या प्रकरणाची तक्रार हॉस्टेलचे वॉर्डन आणि वैद्यकीय अधिकारी रेवत तुकाराम कणिंदे (वय ३७) यांनी केली आहे. ते गेल्या सात वर्षांपासून या हॉस्टेलमध्ये कार्यरत आहेत.
कसा उघड झाला प्रकार?
१२ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वॉर्डनने नेहमीप्रमाणे तपासणी केली असता, खोली क्रमांक १४४ मध्ये फैजल आढळला. तो वर्गाला जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने आपला प्रवेश लखनऊ येथील आरएमएल मेडिकल कॉलेजमध्ये अपग्रेड झाल्याचा दावा केला. कागदपत्रांची मागणी केल्यानंतर त्याने ती वडिलांकडे असल्याचे सांगितले. मात्र, वडिलांना फोन केल्यावर संशय अधिक गडद झाला. सुरुवातीला वडिलांनी मुलगाच नसल्याचे सांगितले, नंतर त्यांनी प्रवेश अपग्रेड झाल्याचा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट केले. कॉलेज प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर फैजलचा कोणताही रोल नंबर, नोंदणी किंवा प्रवेश अस्तित्वात नसल्याचे समोर आले. तसेच, त्याने सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचेही तपासात समोर आले.
वडील दुबईत टेलर, कुटुंबीयांची इच्छा होती मुलगा डॉक्टर बनावा
पोलिस चौकशीत फैजलने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पालकांना आपण एमबीबीएसला प्रवेश घेतल्याचे खोटे सांगितले होते. त्याचे वडील दुबईत टेलर म्हणून काम करतात. कुटुंबीयांची डॉक्टर बनण्याची अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे वसतिगृहात राहण्याचा मार्ग निवडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी बनावट दस्तऐवज तयार करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.