

मुंबई : मनोरंजनात्मक आणि प्रयोगशील सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य देताना वरळीच्या नेहरू सेंटरने युवक-युवतींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विविध कार्यशाळेचे ही आयोजन केलेले आहे. विशेषतः युवक युवतीसाठी गेल्या अनेक वर्षापासून तबला, बासरी, कथक, अभिनय यांना प्राधान्य देताना आता लावणी कार्यशाळेलासुद्धा प्राधान्य दिलेले आहे. युवकांबरोबर लहान मुलांनाही विविध कलेचा आनंद घेता यावा 'नाही खडू - फळा, ही तर मस्तीची शाळा' यासाठी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे निमित्त घेऊन जगभर बालदिन साजरा केला जातो. नेहरू सेंटरनेसुद्धा एक दिवसांच्या कार्यशाळांचे आयोजन केलेले आहे. शनिवार, १४ नोव्हेंबरला या दिवशी नेहरू सेंटरच्या विविध सभागृहात या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनींना या कार्यशाळांचा विनामूल्य आनंद घेता येईल. अभिनय, नृत्य, गायन, वादन, शिल्पकला, चित्रकला, हस्तकला, जादू या कलांचा यात समावेश आहे. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. नेहरू सेंटरने त्यासाठी अभिनव संकल्पना मांडलेली आहे.
१०० विद्यार्थ्यांना प्रवेश
प्रथम येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत प्रवेश दिला आहे. सकाळी ९ ते १ यादरम्यान तज्ज्ञांकडून या कार्यशाळेतल्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले जाईल आणि दुपारी २.३० ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत उपस्थित पालक वर्ग आणि निमंत्रित प्रेक्षकांच्या समोर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आत्मसात केलेल्या कलांचा रंगमंच आविष्कार शंभर कलाकार इथे सादर करतील.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अभिनयासाठी नाट्य प्रशिक्षक रामनाथ थरवळ, नृत्यासाठी नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका पूजा मंत्री, गायनासाठी संगीतकार चंदू पांचाळ, वादनासाठी शैलेश पांचाळ, चित्रकलेसाठी प्रदीप म्हापसेकर, हस्तकलासाठी वैभव चाळके, जादूसाठी समृद्ध कामत, शिल्पकलेसाठी अपुर्वा गावडे यांना निमंत्रित केले आहे.
प्रवेशिका विनामूल्य
कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन नंदकुमार पाटील यांची आहे. प्रवीण कामते आणि मानसी शिंदे सूत्रसंचालन करणार आहेत. संगीत संयोजन ओमकार भुवड यांचे असून निलेश म्हात्रे, रेणुका दलाल यांचा स्वर लाभलेला आहे. निलेश देवधरे यांच्या ॲक्टोपॅडची साथ संगत कार्यक्रमाला आहे.