पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, IMW ला लावणार हजेरी; वाहतुकीत मोठे बदल - कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग?

मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्पुरते वाहतूक निर्बंध आणि मार्ग बदल लागू केले आहेत. हे निर्बंध २७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, IMW ला लावणार हजेरी; वाहतुकीत मोठे बदल - कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग?
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. २९ ऑक्टोबर) रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास ते गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित 'इंडिया मेरीटाईम वीक (IMW) २०२५' मध्ये 'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह'ला संबोधित करतील. तसेच, ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान देखील पंतप्रधान भूषवतील. हा कार्यक्रम जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा सागरी मेळावा ठरणार असून, त्यात सागरी क्षेत्रातील विविध प्रमुख हितधारक एकत्र येणार असल्यामुळे परिसरात व्यापक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

‘सस्टेनेबल मेरीटाईम ग्रोथ आणि ब्ल्यू इकॉनॉमी स्ट्रॅटेजीज’ या विषयावर आधारित पाच दिवसांच्या 'इंडिया मेरीटाईम वीक' या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोमवारी (दि. २७) झाले. या परिषदेद्वारे भारताला जागतिक सागरी शक्ती म्हणून उभे करण्याचा हेतू असून, पंतप्रधान मोदी बंदर पायाभूत सुविधा, हरित शिपिंग उपक्रम आणि पुरवठा साखळी मजबूत करणे या विषयांवर चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानिमित्त मुंबई वाहतूक पोलिसांनी जोगेश्वरी–गोरेगाव परिसरात तात्पुरते वाहतूक निर्बंध आणि मार्ग बदल लागू केले आहेत. हे निर्बंध २७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती 'मिड-डे'ने दिली आहे.

‘नो-एंट्री’ क्षेत्र

  • मृणालताई गोरे जंक्शन ते नेस्को गॅप या मार्गावर सर्वसाधारण वाहनांना प्रवेश बंद असेल.

  • केवळ आपत्कालीन सेवा वाहने, व्हीआयपी ताफे आणि स्थानिक रहिवासी यांनाच प्रवेशाची परवानगी दिली जाईल.

  • राम मंदिर रोडमार्गे मृणालताई गोरे जंक्शनवरून नेस्को गॅपकडे जाणारे उजवे वळण पूर्णपणे बंद राहील.

  • हब मॉल ते जयकोच (नेस्को) जंक्शनपर्यंतचा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद राहील.

एकेरी वाहतूक व्यवस्था

  • नेस्को गॅप ते मृणालताई गोरे जंक्शन हा मार्ग आता एकेरी (वन-वे) म्हणून सुरू राहील.

पर्यायी मार्ग

राम मंदिर दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी:
मृणालताई गोरे फ्लायओव्हर - महानंदा डेअरी पश्चिम द्रुतगती महामार्ग (साउथ सर्व्हिस रोड) - जयकोच चौक - जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) चौक असा पर्यायी मार्ग वापरावा.

JVLR चौकावरून येणाऱ्यांसाठी:
जेव्हीएलआरमार्गे पवईकडे जाणे, किंवा पश्चिम द्रुतगती महामार्गावर (WEH) जाण्यासाठी सर्व्हिस रोड वापरून मुख्य मार्गावर प्रवेश घेता येईल.

नो पार्किंग कुठे? :
१. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (उत्तर आणि दक्षिण दिशेचे मार्ग)
२. नेस्को सर्व्हिस रोड
३. घास बाजार रोड
४. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व्हिस रोड (उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजू)
५. ट्रॉमा केअर हॉस्पिटल सर्व्हिस रोड
६. महानंदा डेअरीसमोरील सर्व्हिस रोड
७. वनराई पोलिस स्टेशन सर्व्हिस रोड
८. निरलॉन कंपनी सर्व्हिस रोड
९. अशोक नगर सर्व्हिस रोड

मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, रिअल-टाइम अपडेट्ससाठी अधिकृत मुंबई पोलिस सोशल मीडिया हँडल्स किंवा वाहतूक हेल्पलाइनवर माहिती मिळवण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in