
मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५ मिमी प्रत्यक्ष तासाची क्षमता असलेली आहे. त्यामध्ये वाढ करून त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे आदेश आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच यासाठी केंद्रीय गृह खात्याच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबईला अधिकचा निधी मिळणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.
मुंबईत उद्भवणारी पूरस्थिती आणि पाण्याचा निचरा याबाबतच्या उपाय योजनांबाबत मुंबई उपनगर पालकमंत्री शेलार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत सरासरी दरवर्षी १६ ते २० दिवस पाऊस पडतो. हा पाऊस एका तासाला १०० मिमीपेक्षा जास्त असल्याचे पालिकेच्या अभ्यासातून समोर आले आहे. सन २०१४ ते २०१९ या कालखंडात तासाला १३१ मिमी तर १९ मे ला जो पाऊस झाला तो एका तासाला १८२ मिमी एवढा होता. २६ जुलै २००५ ला जो जलप्रलय झाला त्यावेळी मुंबईत सुमारे १ हजार मिमी पाऊस १६ तासात झाला होता. तर तासाला १३९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला भरती असल्याने प्रचंड पुराचा फटका मुंबईला बसला होता. आताही १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस एका तासाला होत असून त्याचवेळी भरती असेल तर पाण्याचा निचरा होत नाही व पूरस्थितीचा सामना मुंबईला करावा लागतो.
ज्या भागात पाणी तुंबते अशी ठिकाणे निवडून त्या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ही तासाला १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा करू शकेल, अशी उभारण्यात येणार आहे. याबाबतचा हा अहवाल आयआयटीच्या मदतीने तयार करण्यात येणार असून यासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा आराखडा तयार करताना मुंबईतील रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएसह सर्व प्राधिकरणांचा समन्वय व चर्चा करुन हा अहवाल एका महिन्यात तयार करण्यात यावा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
क्षमता वाढवण्याची आवश्यकता यासाठी
२६ जुलै २००५ पूर्वी मुंबईत पावसाचा पाण्याचा निचरा करणारी जी गटारे होती त्यांची क्षमता ताशी २५ मिमी पाऊस झाल्यावर पाण्याचा निचरा करणारी होती. त्यानंतर गठित केलेल्या चितळे समितीने शिफारस केल्यानुसार त्यामध्ये वाढ करून आता ५५ मि. मी प्रत्येक तासाला पाऊस झाला तर पाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र आता तासाला १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस होत असल्याने ही क्षमता वाढवण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले होते.