

मुंबई : दादर शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रदूषणाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महापालिका आता नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. ‘आयआयटी’च्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पार्क मैदानात दोन स्वतंत्र प्रायोगिक उपाय राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर प्रक्रिया करून तयार होणारे वाळूसदृश्य घटक मैदानातील लाल मातीत मिसळण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. हे मिश्रण वजनाने जड असल्याने मातीचे सूक्ष्म कण हवेत उडण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे धूळप्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दरम्यान, स्थानिक रहिवासी, क्रीडा संघटना, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंनी मैदानाच्या देखभाल व धूळप्रदूषणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी मैदानाची पाहणी आणि प्राथमिक चाचण्या पूर्ण केल्या असून, आता प्रत्यक्ष प्रायोगिक टप्प्याची तयारी सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर हे प्रयोग हाती घेतले जाणार असून, त्यातील निष्कर्षांच्या आधारे कायमस्वरूपी उपाय निश्चित केला जाणार आहे.
विविध उपाययोजना निष्प्रभ
शिवाजी पार्कमध्ये धूळप्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. मैदानाचे सुशोभीकरण, हिरवळ वाढविणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, स्मॉग टॉवर उभारणी, व्हॅक्यूम यंत्राद्वारे धूळ संकलन अशा विविध उपाययोजना यापूर्वी सुचविण्यात आल्या; मात्र त्यापैकी बहुतांश योजना प्रत्यक्षात प्रभावी ठरल्या नाहीत.