

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. नववर्षासाठी १७ हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
बुधवार संध्याकाळपासून गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, बांद्रा बँडस्टँड, जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनारे आदी प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मॉल्समधील उत्सव गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रमुख ठिकाणी आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येणार असून रस्त्यांवरील गस्तही वाढवण्यात येईल.
असा असेल बंदोबस्त
मुंबई पोलीस आणि वाहतूक शाखेच्या समन्वयाने १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३८ उप पोलीस आयुक्त, ६१ साहाय्यक पोलीस आयुक्त, २,७९० पोलीस अधिकारी आणि १४,२०० पोलीस कर्मचारी अशा मोठ्या सुरक्षा दलाची तैनाती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोध व निकामी पथक, होमगार्ड्स तसेच इतर सुरक्षा दलांची संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी तैनाती करण्यात आली आहे. दरम्यान, तातडीच्या मदतीसाठी नागरिकांनी पोलीस हेल्पलाइन क्रमांक १०० किंवा ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.