मुंबईकरांचे 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन धमाकेदार! मेट्रो 'ॲक्वा'च्या पहाटेपर्यंत विशेष फेऱ्या; 'बेस्ट'च्याही जादा बसेस

३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोची ‘ॲक्वालाईन’ (मेट्रो-३) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही. तसेच बेस्टच्याही जादा बसेस ३१ डिसेंबरला धावणार आहेत.
मुंबईकरांचे 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन धमाकेदार! मेट्रो 'ॲक्वा'च्या पहाटेपर्यंत विशेष फेऱ्या; 'बेस्ट'च्याही जादा बसेस
मुंबईकरांचे 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन धमाकेदार! मेट्रो 'ॲक्वा'च्या पहाटेपर्यंत विशेष फेऱ्या; 'बेस्ट'च्याही जादा बसेस
Published on

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाला असून ३१ डिसेंबरला घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोची ‘ॲक्वालाईन’ (मेट्रो-३) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.

ही विशेष सेवा ३१ डिसेंबरला रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही सेवा १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे. म्हणजेच मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिला, कुटुंबीयांसाठी सुरक्षित प्रवास

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.

‘बेस्ट’ने प्रवासाचा आनंदही रात्रभर; पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमाच्या जादा बसेस

मुंबई : नववर्षाचे स्वागत अन् सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाला आहे. थर्टी फर्स्टचा आनंद पर्यटकांना मनसोक्त लुटता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाच्या जादा बसेस ३१ डिसेंबरला धावणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, गोराई खाडी, समुद्रकिनारी जाण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पर्यटकांसाठी जादा बसेस उपलब्ध केल्या आहेत. बुधवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री १० ते गुरुवार, १ जानेवारी २०२६ ला पहाटेपर्यंत बेस्ट बसेस पर्यटकांच्या सेवेत धावणार आहेत. विशेष म्हणजे ५ दुमजली बसेस प्रवासी सेवेत चालवण्यात येणार आहेत.

मुंबईकरांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमामार्फत रात्री उशिरापर्यंत जादा बसगाड्या चालवण्यात येतात. यंदा पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्यांबरोबर ‘हेरिटेज टूर’ या बसमागांवर बुधवारी रात्री ते ते गुरुवारी नववर्षाच्या पहाटेपर्यंत चालवण्यात येणार आहे तर या दिवशी काही गाड्यांच्या मार्गात बदल केले जाणार आहेत.

या मार्गांवर बसगाड्या धावणार

बस क्र - ए २१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते देवनार आगार (३ बस)

बस क्र सी ८६ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते वांद्रे आगार (३ बस)

बस क्र ए - ११२ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते चर्चगेट स्थानक (३ बस)

बस क्र - ए ११६ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (५ दुमजली बस)

बस क्र २०३ - अंधेरी स्थानक पश्चिम ते जुहू चौपाटी (२ बस)

बस क्र २३१ - सांताक्रूझ स्थानक पश्चिम ते जुहू बस स्थानक (४ बस)

बस क्र - ए २४७ व ए २९४ - (बोरिवली बस स्थानक (पश्चिम) ते गोराई बीच (२ बस)

बस क्रमांक २७२ - मालाड स्थानक पश्चिम ते मार्वे चौपाटी (२ बस)

logo
marathi.freepressjournal.in