Mumbai : मलबार हिलमधील 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल' पावसाळ्यात ठरला 'हॉटस्पॉट'; सुमारे ३ लाख पर्यटकांची भेट, BMC च्या खात्यात तब्बल...

पर्यटकांचा अनुभव सुखद राहावा यासाठी प्रत्येक तासाला फक्त २०० जणांना प्रवेश दिला जातो. “खरं तर दिवाळीच्या सुट्यांमध्ये येथे प्रचंड गर्दी झाली होती. अनेक जणांना आगाऊ बुकिंग नसल्यामुळे परत जावं लागलं,”...
मलबार हिल एलिव्हेटेड नेचर ट्रेल
मलबार हिल एलिव्हेटेड नेचर ट्रेलविजय गोहिल, एफपीजे
Published on

मुंबई : मुंबईच्या गजबजाटापासून दूर शांततेचा अनुभव देणारा मलबार हिलमधील 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल' पावसाळ्यात मुंबईकर आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत तब्बल १.८१ लाख पर्यटकांनी या हिरव्यागार वाटेवरून चालत पावसाचा आनंद घेतला. मार्च महिन्यात उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत सुमारे २.९८ लाखांनी येथे भेट दिली असून, पालिकेला या माध्यमातून ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

तासाला फक्त २०० जणांना प्रवेश
सिंगापूरच्या उंचावरच्या ट्रीटॉप वॉकवरून प्रेरणा घेऊन मलबार हिलवरील लाकडी वॉकवे तयार करण्यात आला आहे. ४८५ मीटर लांबीचा आणि २.४ मीटर रुंदीचा हा ट्रेल कमला नेहरू पार्कजवळून सुरू होतो आणि हिरवळीच्या मध्यभागातून शांततेचा अनुभव देतो. पर्यटकांचा अनुभव सुखद राहावा यासाठी प्रत्येक तासाला फक्त २०० जणांना प्रवेश दिला जातो.

मुंबईकरांसाठी २५ रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये

मुंबईकरांसाठी प्रवेश शुल्क २५ रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. या वॉकवेमधून अरबी समुद्राचे मोहक दृश्य दिसते; त्यातच पक्षीनिरीक्षणासाठी स्वतंत्र झोन, काचेतून पाहता येणारा भाग आणि सुंदर व्यूइंग डेकही आहे. पर्यावरणपूरक या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकदा दोन आठवडे आधीच सर्व स्लॉट्स बुक होतात.

पावसातही गर्दी कायम, दिवाळीत अनेकांना जावे लागले परत
हा उंचावरचा वॉकवे दररोज पहाटे ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुला असतो. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च ते ३० सप्टेंबरदरम्यान मलबार हिल नेचर ट्रेलला एकूण २,९१,८३६ पर्यटकांनी भेट दिली आणि त्यातून पालिकेच्या खात्यात ७२,९८,९५० रुपये जमा झाले. जून महिन्यात पर्यटकांची संख्या उन्हाळ्याच्या सुट्यांपेक्षा किंचित कमी होती. तरीसुद्धा मुसळधार पावसातही निसर्गप्रेमींची गर्दी कमी झाली नाही. “खरं तर दिवाळीच्या सुट्यांमध्ये येथे प्रचंड गर्दी झाली होती. अनेक जणांना आगाऊ बुकिंग नसल्यामुळे परत जावं लागलं,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

महिन्यानुसार आकडेवारी :

  • मार्च ते मे – १,१०,३२७ पर्यटक → उत्पन्न – २७,९५,४५० रुपये

  • जून – ४५,५१५ पर्यटक → उत्पन्न – ११,४९,२०० रुपये

  • जुलै – ५३,७०७ पर्यटक → उत्पन्न – १३,६५,७०० रुपये

  • ऑगस्ट – ४८,२५४ पर्यटक → उत्पन्न – ११,२५,०२५ रुपये

  • सप्टेंबर – ३४,०३३ पर्यटक → उत्पन्न – ८,६३,५७५ रुपये

logo
marathi.freepressjournal.in