मुंबई : महानगरपालिकेच्या एच-पश्चिम विभागात शुक्रवारी जुनी जलवाहिनी बदलणे तसेच जोडणीचे काम केले जाणार असल्याने खार, वांद्रे आदी परिसरात काही भागांत पाणीपुरवठा बंद राहील.
पाली हिल जलाशय १ ची जुनी, जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी काढून टाकली जाणार आहे. वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेली ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी सुरू केली जाणार आहे. हे काम ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून रात्री १२ वाजेदरम्यान केले जाणार आहे. यामुळे एच-पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी सुधारून रहिवाशांना चांगला पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
येथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असेल
-पेरी परिक्षेत्र - वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग.
-खार दांडा परिक्षेत्र - खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेचा काही भाग.