

मुंबई : मुंबईकरांना दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. तर दुसरीकडे मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी स्वयंचलित बंद होणारे मेट्रोचे कोच जोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई उपनगरीय लोकल एसी झाल्या, तरी सेकंड क्लासच्या तिकिट दरात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच वरळी ते बीकेसी टनेल तयार करण्यात येत असून ते सांताक्रूझ येथील डोमेस्टिक विमानतळाला हे टनेल जोडले जाणार आहे. यामुळे साऊथ मुंबई वरुन डोमेस्टिक विमानतळापर्यंत २० मिनिटांत प्रवास होणार आहे. मुंबईला टनेलच्या नेटवर्कशी जोडले जाणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ ठरणार असून तेथून गेट वे ऑफ इंडियापर्यत वॉटर टॅक्सीने प्रवास करणे शक्य होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वरळी येथील डोम मध्ये आयोजित ‘आयआयएमयूएन’ कार्यक्रमात ते बोलत होते. “अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे विस्तारले जाणार याविषयी बोलायचो तेव्हा विरोधक ट्रोल करत होते, विधानसभेतही चेष्टा करायचे. परंतु मुंबईचा विकास झपाट्याने होत असून मुंबईचा आताचा विकास हा ट्रेलर आहे. पुढील पाच ते सात वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. “सध्या ६० टक्के मुंबईकर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेचा वापर करतात. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड वरळी ते अटल सेतू असा थेट प्रवास करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येत असून तो वर्षभरात पूर्ण होईल. दरवर्षी ५० किमीचे मेट्रोचे जाळे निर्माण केले जाणार असून यामुळे मुंबईत कुठूनही कुठे जाणे शक्य होणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मुंबई वन ॲप तयार केले असून एकाच तिकिटावर रेल्वे, मेट्रो, बेस्ट बस व मोनोचा प्रवास करता येणार आहे. रो-रो सर्विस अलिबागपर्यंत आहे. परंतु आता वॉटर ट्रान्सपोर्ट तयार करण्यात येत आहे. यातील प्रत्येक गोष्ट फक्त कागदावर नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी स्तरावर आहे,” असेही ते म्हणाले.
१५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार
मध्य रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या लोकल गाड्या दाखल होणार असून त्यासाठी ३४ स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचे कामही पूर्ण होणार आहे. यामुळे लोकलची गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. “१२ डब्यांच्या लोकलला १५ डब्यांमध्ये रूपांतरित करण्याची योजना बराच काळ प्रलंबित होती. पण मुंब्रा दुर्घटनेनंतर हा प्रस्ताव गतीने पुढे नेण्यात आला. निविदा मंजूर झाल्यानंतर आणि काम सुरू झाल्यावर सर्व लोकलना १५ डब्यांच्या रेक्समध्ये रूपांतरित करण्यास साधारण एक वर्ष लागू शकतो,” असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिकिटाच्या किमतीत बदल नाही
आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित होणार असले तरी द्वितीय श्रेणीचे तिकीट एक रुपयानेही वाढवण्यात येणार नाही. सध्याच्या तिकीट दरानेच आम्ही मुंबईकरांना वातानुकूलित ट्रेनचे तिकीट देणार आहोत. मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायक होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या माध्यमातून ही सुधारणा करण्यात येणार आहे. जगातील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीपैकी एक असलेल्या मुंबई लोकलचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.