ऑफिसच्या वेळा बदलणार? आस्थापनांनी फिरवली पाठ; मध्य रेल्वे घालणार रेल्वे मंत्रालयाला साद

केवळ ३३ आस्थापनांनी कार्यालयीन वेळेत बदल केला असल्याने आता मध्य रेल्वे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय (PTI)
Published on

मुंबई : उपनगरीय लोकलमधील अलोट गर्दीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गर्दीच्या वेळेत लोकलला होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विविध आस्थापनांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाकडे शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांनी पाठ फिरवली आहे. केवळ ३३ आस्थापनांनी कार्यालयीन वेळेत बदल केला असल्याने आता मध्य रेल्वे रेल्वे मंत्रालयाला साद घालणार आहे.

मध्य रेल्वे मुख्य उपनगरीय मार्गावर कर्जत- कसारा या मार्गावर लोकल चालवते. लोकलच्या माध्यमातून लाखो प्रवाशी दररोज मुंबईत कामासाठी येतात. यामध्ये शासकीय आणि खाजगी आस्थापनांचा समावेश आहे. सकाळी ७ सुमारे १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत लोकल गर्दीने तुफान भरून धावत असतात. लोकलमध्ये प्रवेश करण्यासही जागा नसल्याने प्रवाशी दरवाजाबाहेर लटकून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमधून पडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

शासकीय आणि खासगी आस्थापनांची कार्यालयीन वेळ एकाच असल्याने लोकलला गर्दी होते. गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ६०० शासकीय आणि खासगी आस्थापनांना पत्र लिहून कार्यालयीन वेळ बदलण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार केवळ ३३ आस्थापनांनी कार्यालयीन वेळ बदलली आहे. तर इतर आस्थापनांनी रेल्वेच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

रेल्वे मंत्रालयाला साकडे

कार्यालयीन वेळा बदलण्याकडे मुंबईतील आस्थापनांनी दुर्लक्ष आहे. त्यामुळे या प्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबतचे पत्र रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा झाल्यास लोकलमधील गर्दीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in