

मुंबई : सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार रोड येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काष्टे (५० ) यांचा मृत्यू झाला असून अजय ठाकूर (३०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सांताक्रूझ पूर्व येथील आठव्या गोळीबार रोडवरील व्ही. एन. देसाई रुग्णालयासमोरील ‘भव्य निकेतन’ या गृहनिर्माण संस्थेने आपल्या इमारतीतील अंतर्गत सांडपाणी वाहिनीच्या सफाईचे काम खासगी कामगारांकडे सोपविले होते. हे काम सुरू असताना संबंधित व्यक्तींनी महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेचे सांडपाणी वाहिनीचे मॅनहोल उघडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सफाईचे काम सुरू असताना दोन कामगार गटारात पडल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मृत आणि जखमी कामगारांची ओळख अद्याप पटलेली नाही.