

मुंबई : मुंबईतील मोकळी मैदाने हडपण्याचा भाजपचा डाव असून गेल्या चार वर्षांत तब्बल १७ ते १८ मैदानाचे आरक्षण बदलून हे भूखंड भाजपशी संबंधित संस्थांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर रविवारी दुपारी तिरंगा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुंबईची मोकळी मैदाने, मुंबईतील रिक्रिएशन ग्राऊंड्स, प्ले ग्राऊंड ही मैदानेच राहिली पाहिजेत आणि त्यावर काँक्रिट टाकले नाही पाहिजे, हे ठरवण्यासाठी आज आपण जमलो आहोत. मुंबईतील मैदानं आणि झाडं कमी होत आहेत. जर आपण एकत्र नाही आलो तर हे लोक मुंबई गिळून टाकतील.”
“गेल्या चार वर्षात १७ हून अधिक मैदाने निवासी किंवा कर्मशिअल करण्यात आली आहे. २०१७ मध्ये मुंबईचा २०३४ चा डेव्हलपमेंट प्लॅन बनला, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक आणि महापौरांना एकही मैदान बिल्डर आणि ठेकेदाराच्या हातात द्यायचे नाही, असे सांगितले होते. तसेच मैदान हे मैदानच राहिले पाहिजे, अशी देखील भूमिका घेतली होती, मात्र त्यानंतरही मुंबई पालिका आणि भाजप मैदाने गिळायला निघाले आहेत. विकास व्हावा, पण मैदाने संपवून नको,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
“नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाची मूळ जागा २.५८ हेक्टर आणि हा ६ एकरचा प्लॉट आहे. हा भूखंड फुटबॉलसाठी दिला, असा दावा भाजप करत आहे. मात्र त्यांनी फक्त इथली मधली जागा दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे मैदान वाचवण्याची लढाई आजपासून सुरू झाली आहे. मोकळी मैदाने वाचवण्यासाठी मुंबईकरांचा मोठा वर्ग रस्त्यावर उतरणार आहे. आपल्या मोकळ्या मैदानांसाठी आपण लढत राहू आणि जोपर्यंत आम्हाला आमची मैदान मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही महापालिकेच्या चौकात येऊन बसू,” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
स्क्रीनटाईम कमी होणार कसा ?
“मुख्यमंत्री फडणवीस जेन-झीसोबत संवाद साधत होते आणि तेव्हा त्यांनी म्हटले की, मुलांनी स्क्रीनपेक्षा मैदानावर असावे. पण तुम्ही मैदान कुठे ठेवताय? या मैदानाच्या मागची एसआरए तुमच्या मित्राच्या घशात घातली आहे. तसेच मुंबईतल्या अनेक जागा भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत,” असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.