Mumbai : उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न पुन्हा रडारवर; मुलाच्या मृत्यूबाबत ६ ऑक्टोबरला सुनावणी

मुंबई आणि ठाण्यातील मॅनहोल्सचा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयाच्या रडारवर आला आहे. डोंबिवलीतील १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेवर खंडपीठाने लक्ष वेधून घेत ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न पुन्हा रडारवर
उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न पुन्हा रडारवर
Published on

मुंबई : मुंबई शहर व ठाणे जिल्ह्यातील पालिकांच्या क्षेत्रातील मॅनहोल्सचा प्रश्न पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आला आहे. डोंबिवलीमधील १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेकडे लक्ष वेधण्यात आले असून याबाबत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने ६ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे. या सुनावणीवेळी न्यायालय महानगर क्षेत्रातील उघडे मॅनहोल्स व खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला निर्देश देण्याची शक्यता आहे.

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात डोंबिवलीतील उघड्या नाल्यात वाहून गेलेल्या १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूने उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावर याचिका दाखल करणाऱ्या ॲड. रुजू ठक्कर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात या घटनेचा उल्लेख केला आणि या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने खड्डे आणि उघड्या मॅनहोल्सच्या प्रश्नावर ६ ऑक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. खड्यांचा मुद्दा ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी येईल, तेव्हा उघड्या मॅनहोल्सचा मुद्दा निदर्शनाला आणून द्या, असे खंडपीठाने याचिकाकर्त्या ठक्कर यांना सूचित केले.

उघड्या नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

२८ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता दावचीपाडा येथील भरत भोईर नाल्याजवळ आयुष कदम नावाचा अल्पवयीन मुलगा उघड्या नाल्यात पडून वाहून गेला. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) अग्निशमन दलाने शोध सुरू केला आणि अखेर एका तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात संतप्त निदर्शने केली.

logo
marathi.freepressjournal.in