अटल सेतूवरून ५० लाखांहून जास्त वाहनांचा प्रवास; ७ महिन्यांत सर्व प्रकारच्या वाहनांकडून वापर

अटल सेतू १३ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या सेतूचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांकडून करण्यात येत आहे.
अटल सेतूवरून ५० लाखांहून जास्त वाहनांचा प्रवास; ७ महिन्यांत सर्व प्रकारच्या वाहनांकडून वापर
Published on

मुंबई : अटल सेतूवरून १३ जानेवारी ते २५ ऑगस्ट २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत ५० लाख ४ हजार ३५० वाहनांचा प्रवास झाला आहे. अटल सेतू १३ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या सेतूचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांकडून करण्यात येत आहे.

अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करत आहेत.

हा सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई, पनवेल, आणि पुणे या शहरांशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर वरळी सी-फेसवरून अटल सेतूवर ५ ते १० मिनिटांत पोहोचता येते. शिवाय, चिरले इंटरचेंजपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान उन्नत मार्गाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर, दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरे ते नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होणार आहे.

अटल सेतूच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या विमानतळांदरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. हा सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षणीय कमी होणार आहे.

या नव्या सेतूमुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी आता पूर्वीपेक्षा कमी वेळ लागणार आहे. अटल सेतूचा वापर केल्याने मुंबईच्या दोन्ही विमानतळांमधील वाहतूक सुलभ होईल आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. यामुळे विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल. याचा फायदा केवळ व्यावसायिक प्रवाशांना नव्हे, तर सर्वसामान्य प्रवाशांनाही होईल.

‘वाहतुकीतील एक मोठा बदल’

अटल सेतूमुळे सुलभ झालेल्या प्रवासाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अटल सेतूच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीत एक मोठा बदल घडला आहे आणि लाखो लोकांनी याचा उपयोग केला आहे. केवळ सात महिन्यांच्या कालावधीत अटल सेतूवरून ५० लाख वाहने धावली, यावरून या पुलाचे महत्त्व आणि उपयुक्तता दिसून येते. या सेतूमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाची सुविधा मिळत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाढत्या वाहतुकीवरही प्रभावी तोडगा म्हणून याचा उपयोग होत आहे आणि लाखो नागरिकांना याचा लाभ होत आहे.

‘जलदगतीने आणि सुरक्षितपणे प्रवास’

एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, अटल सेतूच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलदगतीने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. हा प्रकल्प भविष्यातील अनेक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तंत्रज्ञान, नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती एकत्र आल्याने व्यापक सामाजिक बदल कशा प्रकारे घडून येऊ शकतो, याचे अटल सेतू हे एक उत्तम उदाहरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in