

मुंबई : न्यायालयाच्या तंबीमुळे मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका आता अन्यत्र चार ठिकाणी मर्यादित स्वरूपात कबुतरखाने सुरू करण्याचा विचार करत आहे. या ठिकाणांमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर, आरे मिल्क कॉलनी, वडाळ्याजवळील खारफुटी पट्टा आणि गोराई परिसराचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिला. यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील कबुतरखाने बंद केले. यानंतर जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेत पुन्हा कबुतरखाने सुरू करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. तसेच कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी केली.
मंगळवारी जैन समाजाच्या प्रतिनिधीमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगरानी यांची भेट घेऊन कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी केली. गगरानी यांनी योग्य ठिकाणांचा शोध घेऊन त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आश्वासन दिले व सध्या हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगितले.
पालिका अधिकाऱ्यांची ‘त्या’ जागांना पसंती
तत्पूर्वी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात पालिकेच्या २५ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कबुतरखान्यांसाठी संभाव्य जागांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर, आरे मिल्क कॉलनी, वडाळ्याजवळील खारफुटी पट्टा आणि गोराई परिसर या चार ठिकाणांचा विचार करण्यात आला. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी मानवी वस्ती नसल्याने कबुतरखाने स्थापन करण्यासाठी या जागा योग्य असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
