
मुंबई पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा निर्णय घेतला आहे. शहरात आता चालकासह कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेटनंतर चारचाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयानंतर मुंबई पोलिसांनी ज्यांच्या गाड्यांमध्ये सीट बेल्ट नाही त्यांना ताबडतोब लावण्याचे निर्देश दिले आहेत. सीट बेल्टशी संबंधित आवश्यक सुधारणा करण्यासाठी १ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोटार वाहन कायदा 2019 च्या कलम 194(ब) (1) मध्ये असे नमूद केले आहे की चारचाकी मोटार वाहनाचा चालक आणि इतर प्रवाशांनी प्रवास करताना सीट बेल्ट न लावल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यानुसार ज्या चारचाकी वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्टची सुविधा नाही, त्यांना सीटबेल्टची आवश्यकता सुधारण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर चारचाकी मोटार वाहनातून प्रवास करणाऱ्या चालक आणि इतर प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल अन्यथा मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 च्या कलम 194 (ब) (1) अंतर्गत कारवाई करण्यात येईल.