Mumbai : 'लिओ'ला गुन्हे शाखेचा अखेरचा निरोप; गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका

गुन्हे शाखेच्या श्वान पथकातील ‘लिओ’ या श्वानाला मुंबई पोलिसांनी शनिवारी शासकीय इतमामात अखेरची सलामी दिली. आरोपींचा माग काढत आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध लावून अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीला आणण्यात लिओने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
'लिओ'ला गुन्हे शाखेचा अखेरचा निरोप; गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका
'लिओ'ला गुन्हे शाखेचा अखेरचा निरोप; गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिकाX
Published on: 

पूनम अपराज/मुंबई

गुन्हे शाखेच्या श्वान पथकातील ‘लिओ’ या श्वानाला मुंबई पोलिसांनी शनिवारी शासकीय इतमामात अखेरची सलामी दिली. आरोपींचा माग काढत आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध लावून अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीला आणण्यात लिओने महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही दिवसांपासून आजारी असलेल्या लिओचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला अखेरचा निरोप देताना पोलीस अधिकारी व कर्मचारी भावूक झाले होते.

लिओ अवघ्या दीड महिन्यांचा असताना मुंबई गुन्हे शाखेच्या श्वान पथकात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने पुण्यातील एका केंद्रात सहा महिने कठोर प्रशिक्षण घेतले होते. जर्मन जातीचा डाॅबरमॅन असलेला लिओ खून, अपहरण, बेपत्ता व्यक्ती आणि घरफोडी यांसारखे गुन्हे उकलण्यात महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. नऊ वर्षे तीन महिने वयाच्या लिओची प्रकृती बिघडल्याने त्याला परळ येथील एका पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

सेवानिवृत्त होण्याआधीच मृत्यू

लिओचे हँडलर यशवंत रेवणकर यांच्या माहितीनुसार, लिओ पुढील वर्षी जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणार होता. रेवणकरांनी लिओने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे अनेक प्रसंग यावेळी आठवले. 'लिओने त्याच्या सेवाकाळात अशा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आम्हाला मदत केली,' असे रेवणकर यांनी सांगितले.

अनेक गुन्हेगारांना टाकले तुरुंगात

लिओने केवळ मुलाच्या कपड्यांच्या आधारे अवघ्या दीड तासात पवईतील एका हरवलेल्या मुलाचा शोध लावला होता. मशीद बंदर येथे दगडफेक करून एका व्यक्तीच्या हत्येच्या दुसऱ्या प्रकरणात, लिओने ओळख परेड दरम्यान आरोपीची अचूक ओळख पटवली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in