पंतप्रधानांच्या बनावट पत्राद्वारे खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक; मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई

पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र दाखवून एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालिकेकडून ४ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. तौसीफ हुसेन इस्माईल पटेल आणि सिद्धीनाथ दीनानाथ पांडे उर्फ सुनील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते गोरेगाव येथील रहिवासी आहेत.
पंतप्रधानांच्या बनावट पत्राद्वारे खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक; मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई
पंतप्रधानांच्या बनावट पत्राद्वारे खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक; मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई
Published on

पूनम अपराज/मुंबई

पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र दाखवून एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालिकेकडून ४ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. तौसीफ हुसेन इस्माईल पटेल आणि सिद्धीनाथ दीनानाथ पांडे उर्फ सुनील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते गोरेगाव येथील रहिवासी आहेत. आरोपींना एस्प्लनेड न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिला २०२० पासून 'मेगा श्रेया' नावाची समाजसेवी संस्था चालवतात. २०२२ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांची ओळख जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या तौसीफ पटेल आणि फर्नाझ वाडिया यांच्याशी झाली होती. १८ मार्चला पटेलने या महिलेला व्हॉट्सॲपवर व्हॉइस नोट पाठवून पंतप्रधान कार्यालयाकडून वाढदिवसाचे शुभेच्छा पत्र मिळवून देतो, असे आमिष दाखवले. सुरुवातीला हा दावा फोल वाटल्याने तक्रारदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आरोपींनी हे पत्र खरे असल्याचे भासवून पीआर शुल्काच्या नावाखाली ४ लाख रुपयांची मागणी केली. २८ मार्चला फर्नाझ वाडियाने पंतप्रधान मोदी यांची स्वाक्षरी असलेले एक डिजिटल पत्र तक्रारदाराला पाठवले. या पत्रात त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले होते. संशय आल्याने तक्रारदाराने हे पत्र समाजमाध्यमावरून हटवले, तेव्हा आरोपींनी पैशांसाठी त्यांच्यावर दबाव वाढवला.

आरोपींनी तक्रारदाराच्या नावाने एक बनावट ई-मेल आयडी तयार करून हा पत्रव्यवहार खरा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. २ एप्रिलला वरळी येथील एका कॅफेमध्ये झालेल्या भेटीत आरोपींनी पंतप्रधान कार्यालयात आमचे संबंध असल्याचे सांगून ४ लाख रुपये दिल्यास मूळ फ्रेम केलेले पत्र देण्याचे आश्वासन दिले. सततच्या धमक्यांमुळे तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. खंडणीविरोधी पथकाने वरळी सी फेस येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून खंडणीची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले.

आरोपींकडून बनावट स्वाक्षरीचे पत्र जप्त

पोलिसांनी आरोपींकडून पंतप्रधानांच्या बनावट स्वाक्षरीचे फ्रेम केलेले पत्र, खेळण्यातील नोटांचे बंडल, दोन खऱ्या ५०० रुपयांच्या नोटा आणि दोन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी तो खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण थोरात या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग आहे का, तसेच अशा प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in