

मेघा कुचिक/मुंबई
‘खबरी’ म्हणजे गुप्त माहिती देणारा पोलीस यंत्रणेचा अविभाज्य भाग. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाने पोलीस यंत्रणेमध्ये क्रांती घडवली असली तरीही, ‘खबरीं’चे महत्त्व आजही तितकेच कायम आहे.
सध्या अत्याधुनिक टेहळणी प्रणाली, डिजिटल फॉरेन्सिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही पोलिसांना गुन्हे उलगडण्यास मदत करत आहेत. तेव्हा खबरी अजूनही आवश्यक आहेत का? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण वास्तव असे आहे की मानवी बुद्धिमत्तेची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.
खबरी हे पोलिसांचे डोळे आणि कान असतात. गुन्हेगारी हालचाली, टोळ्यांच्या हालचाली आणि संशयास्पद वर्तन याबाबत ते अशी माहिती पुरवतात जी कोणतीही डिजिटल प्रणाली पूर्णपणे ओळखू शकत नाही. त्यांच्या सूचनांमुळे अनेक वेळा मोठे गुन्हे उलगडतात. विशेषतः अशा प्रकरणांमध्ये जिथे विश्वास आणि मानवी संबंध डेटापेक्षा अधिक महत्वाचे ठरतात. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि तपास यंत्रणेची मुळे म्हणजे खबरी. अंमली पदार्थांचा मागोवा घेण्यापासून ते गँगवॉर टाळण्यापर्यंत, ते शांतपणे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यात योगदान देतात.
पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये नेहमीच एक ओळ दिसते. ती म्हणजे, ‘गुप्त माहितीदाराच्या टिपवर कारवाई करण्यात आली.’ हे गुप्त माहितीदार म्हणजेच खबरी. मुंबई पोलिसांमध्ये अशा खबरींची एक वेगळीच, रहस्यमय पण अत्यावश्यक दुनिया आहे. सर्वसामान्य लोकांची या वर्गाबद्दलची प्रतिमा बहुधा बॉलिवूड चित्रपटांमधून तयार झालेली असते. अंधाऱ्या गल्लीमधून फोन करणारा संशयास्पद व्यक्ती. मात्र, वास्तव खूपच गुंतागुंतीचे आणि वास्तववादी आहे.
अनेक खबरी हे सर्वसामान्य असतात. रस्त्यावरचे विक्रेते, रिक्षाचालक, छोटे व्यापारी किंवा पानवाल्यांसारखे. ते त्यांच्या परिसरातील संशयास्पद हालचालींबाबत माहिती देतात. त्यांना थेट आर्थिक लाभ मिळत नाही, पण पोलिसांना ओळखत असल्यामुळे त्यांना एक सामाजिक ओळख आणि सुरक्षिततेची भावना मिळते. काहींना त्यांच्या व्यवसायात पोलिसांकडून अनावश्यक त्रास होऊ नये म्हणूनही हे फायदेशीर ठरते. काही लोक तर सामाजिक जबाबदारी म्हणून माहिती देतात, जरी त्यांना ‘व्यावसायिक माहितीदार’ मानले जात नाही.
पण खरे पोलीस माहितीदार म्हणजे ते जे गुन्हेगारी जगातूनच माहिती पुरवतात. काहीजण स्वतः कधी तरी टोळ्यांशी संबंधित असतात, काही जुने गुन्हेगार असतात, तर काही गुन्हेगार सध्या सुधारणेच्या मार्गावर असतात. काहीजण अजूनही गुन्हेगारी जगाशी संबंध ठेवून पोलिसांनाही मदत करतात. तुरुंगातही असे ‘कच्चे’ कैदी असतात जे गुन्हेगारी नेटवर्कविषयी किंवा नियोजित कारवायांविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांपर्यंत पोचवतात. काहीवेळा तर असे माहितीदार राजकीय व्यक्ती, उद्योगपती आणि गुन्हेगारी जगाशी जोडलेले असतात.
माहितीदाराची ओळख नेहमीच गुप्त ठेवली जाते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस त्यांचे नाव कधीही उघड करत नाहीत. अगदी यशस्वी ऑपरेशन किंवा एन्काउंटरच्या अहवालातसुद्धा नाही.
माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुरडकर म्हणतात, ‘तंत्रज्ञान किंवा यंत्रे मानवी बुद्धिमत्तेची जागा घेऊ शकत नाहीत. डिजिटल युगात ही साधने उपयुक्त आहेत, पण शेवटी माणसाची बुद्धिमत्ता सर्वात महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, १९९८ मध्ये भारताने केलेली अणुचाचणी. ती अमेरिकन गुप्तचर संस्थांनाही त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानासह ओळखता आली नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘खबरी’ हा विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. काही लोक पैशासाठी माहिती देतात, पण पोलिसांना त्यामागील स्वार्थ ओळखावा लागतो. माणूस खोटं बोलू शकतो, म्हणून मी कधीच किरकोळ माहितीदारांवर विश्वास ठेवला नाही. मी फक्त विश्वासार्ह लोकांवर अवलंबून होतो. डिजिटल नवकल्पनांच्या काळातही पोलीस दलात खबरींचे महत्त्व कायम राहणार आहे.’
मुंबई पोलिसांमधील खबऱ्यांचा इतिहास अनेक दशकांचा आहे. १९६० च्या दशकात तस्करी मोठ्या प्रमाणात होत असे. प्रतिस्पर्धी व्यापारी एकमेकांच्या बोटी पकडण्यासाठी पोलिसांना गुप्त माहिती देत असत. तेव्हापासून खबऱ्यांची सुरुवात झाली. नंतरच्या काळात, विशेषतः १९८० आणि १९९० च्या दशकातील गँगवॉरच्या काळात, खबरींची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली. त्यांच्या माहितीमुळे अनेक एन्काउंटर झाले, टोळ्या उद्ध्वस्त झाल्या. त्या काळात अनेक खबरींनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून पोलिसांना मदत केली.
मग खबरींना त्याबदल्यात काय मिळते? उत्तर आहे ‘गुप्तचर अर्थव्यवस्था’. अनेक व्यावसायिक खबरी आपल्या माहितीवरच उपजीविका करतात. माहिती जितकी महत्त्वाची, बक्षीस तितके मोठे. काही जण तर पोलिसांच्या ‘पे रोल’वर असतात, असेही म्हटले जाते.
पैशांशिवाय, पोलीस खात्यांकडून अशा माहितीदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गुप्त स्वरूपात मदतही दिली जाते. जर खबरी जखमी झाला किंवा तुरुंगात गेला, तर त्याच्या कुटुंबाला पोलीस अधिकारी आर्थिक सहाय्य देतात. त्याचा निधी ‘गुप्त’ असतो. असा निधी जो अधिकृतरीत्या खबऱ्यांना मोबदला देण्यासाठी वापरला जातो.
गुन्हेगारी जगत व पोलिसांमधील दुवा
तंत्रज्ञानामुळे पोलीस यंत्रणा अधिक वेगवान आणि शास्त्रीय झाली आहे. पण ‘खबरी’ आजही वास्तव आणि अधिकृत गुप्तचर यंत्रणा यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत. गुन्हेगारी जगत व पोलीस यंत्रणांमधील हा दुवा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी उपयुक्त ठरत आला आहे. त्यामुळेच प्रत्येक मोठ्या कारवाईमागे असतो एक अदृश्य आवाज. हा आवाज म्हणजे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व काही धोक्यात घालणारा एक ‘खबरी’ असतो.