निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल यांना धमकी; गुन्हा दाखल

दाऊदी बोहरा समुदायाच्या उत्तराधिकार वादावर २०२४ मध्ये दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबाला धमकीची पत्रे पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल यांना धमकी; गुन्हा दाखल
निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल यांना धमकी; गुन्हा दाखल
Published on

मुंबई : दाऊदी बोहरा समुदायाच्या उत्तराधिकार वादावर २०२४ मध्ये दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबाला धमकीची पत्रे पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

न्यायाधीश पटेल यांनी सांगितले की, त्यांनी रविवारी मुंबईतील गावदेवी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(३) आणि ३५१(४) अन्वये गुन्हेगारी धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

निवासस्थानी धमक्या

तक्रारीनुसार, न्या. पटेल आणि त्यांच्या कुटुंबाला गेल्या १० महिन्यांत अनेक अनामिक धमकीची पत्रे मिळाली आहेत. ५ जून रोजी या त्रासाची तीव्रता आणखी वाढली, जेव्हा त्यांच्या मुलीच्या लंडन येथील निवासस्थानी जर्मनीचा पोस्टल मार्क (टपाल तिकीट) असलेले अत्यंत गंभीर धमकीचे पत्र आले. या पत्रात त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगत कुटुंबाविरुद्ध ‘सुपारी’ (कॉन्ट्रॅक्ट) देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पत्रासोबत एक डिजिटल स्टोरेज डिव्हाइसही (पेन ड्राईव्ह/मेमरी कार्ड) पाठवण्यात आले होते, जे आता लंडन पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

जाहीर माफीची मागणी

धमकी देणाऱ्यांनी निवृत्त न्यायाधीशांकडे मागणी केली आहे की, त्यांनी यूट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्या निकालाची जाहीर माफी मागावी आणि हा निकाल मागे घ्यावा.

सुरक्षा प्रदान

गेल्या आठवड्यात, युकेच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी हा मुद्दा भारतीय उच्चायुक्त पी. कुमारन यांच्याकडे उपस्थित केला. यानंतर लंडन पोलिसांनी न्या. पटेल आणि त्यांच्या कुटुंबाला तेथे सुरक्षा कवच पुरवले. उच्चायुक्तांनी माजी न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

काय होता वादग्रस्त निकाल

न्यायाधीश गौतम पटेल यांच्या एकल खंडपीठाने सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे दाऊदी बोहरा समुदायाचे ५३ वे ‘दाई अल-मुतलक’ (नेते) म्हणून स्थान कायम ठेवले होते. त्यांची नियुक्ती वैध असल्याचे न्यायालयाने मान्य केले होते. जानेवारी २०१४ मध्ये ५२ वे दाई सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाल्यानंतर, त्यांचे भाऊ खुझैमा कुतुबुद्दीन यांनी दाखल केलेला दावा न्या. पटेल यांनी फेटाळून लावला होता.

logo
marathi.freepressjournal.in