
मुंबई : उद्यापासून साजरा होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि सुरक्षितरीत्या पार पडावा यासाठी मुंबई पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून १७ हजार ६०० हून जास्त पोलीस कर्मचारी पुढील ११ दिवस तैनात राहणार आहेत.
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत वाहतूक नियमनासाठी मुंबई पोलीस दलाकडून ३६ पोलीस उपायुक्त, ५१ सहाय्यक आयुक्त, २,६३७ निरीक्षक आणि १४,४३० पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅक्ट तसेच गृहरक्षक दल अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय गणेश विसर्जनासाठी विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वाढीव बंदोबस्तही नेमण्यात येणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलिसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास पोलिसांना त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी, नागरिकांनी नियमांचे भान ठेवून गणेशोत्सव उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करावा, नागरिकांनी तत्काळ पोलीस मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन १०० अथवा ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या १० दिवसीय गणेशोत्सवात कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली. किमान १५ हजार पोलीस कॉन्स्टेबल, २,६०० उपनिरीक्षक व निरीक्षक, ५१ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ३६ उप पोलीस आयुक्त संपूर्ण शहरभर तैनात राहतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ड्रोनचाही वापर होणार आहे.
या बंदोबस्तामध्ये घोडेस्वार पथक, ड्रोन, बॉम्बशोध व नाश पथक तसेच श्वान पथकाचाही समावेश असेल. मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असलेल्या प्रमुख गणेश मंडपांमध्ये व विसर्जन स्थळांवर हा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दी नियंत्रणासाठीही विशेष खबरदारी घेतली जात आहे, असे कायदा व सुव्यवस्था विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लालबागचा राजा गणेश मंडळासाठी स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या दोन दिवसांत सर्व गणेश मंडळांशी बैठक घेऊन शांततेत आणि सुरक्षिततेत उत्सव पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विसर्जन स्थळे आणि समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात केली जाणार असून गिरगाव चौपाटीवर विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. पोलीस वॉचटॉवर, ध्वनीप्रणाली (पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम), बीट मार्शल्स आणि सिव्हिल कपड्यातील पोलिसांची नेमणूक करून अपघात किंवा अप्रिय घटना टाळल्या जाणार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
प्रमुख मागण्या काय?
मुंबई पोलीस दलाकडून ३६ पोलीस उपायुक्त, ५१ सहाय्यक आयुक्त, २,६३७ निरीक्षक आणि १४,४३० पोलीस अंमलदार तैनात
महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅक्ट तसेच गृहरक्षक दल अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनचाही वापर होणार