मुंबई पोलिसांनी चक्क उंदरांकडून जप्त केले १० तोळे सोने

रस्त्यात काही भीक मागणारी लहान मुले दिसली असता त्यांनी त्यांना पावाची पिशवी दिली. यावेळी चुकून सोन्याची पिशवीही त्यांनी देऊन टाकली
मुंबई पोलिसांनी चक्क उंदरांकडून जप्त केले १० तोळे सोने

पोलिसांनी चोरांकडून मुद्देमाल जप्त केल्याचे आपण नेहमीच वाचत आलो आहोत. पण पोलिसांनी चक्क उंदरांकडून सोने जप्त केले असल्याचे कुणालाही खरे वाटणार नाही. पण खरेच मुंबईत दिंडोशी पोलिसांना उंदरांमुळे पाच लाख किंमतीचे १० तोळे सोने सापडले आहे.

आरे मिल्क कॉलनीत राहणाऱ्या सुंदरी या ४५ वर्षीय महिला घरकाम करून गुजराण करतात. १३ जूनला दुपारी ज्यांच्या घऱी त्या काम करतात त्यांनी तिला खाण्यासाठी पाव दिला होता. घऱातून निघाल्या तेव्हा त्यांच्याकडे १० तोळे सोने होते. ते सोने बँकेत गहाण ठेवण्यासाठी त्यांनी सोबत घेतले होते. रस्त्यात काही भीक मागणारी लहान मुले दिसली असता त्यांनी त्यांना पावाची पिशवी दिली. यावेळी चुकून सोन्याची पिशवीही त्यांनी देऊन टाकली. बँकेत गेल्यानंतर त्यांना सोन्याची पिशवी गायब झाली असल्याचे लक्षात आले. चुकून लहान मुलांना आपण पिशवी दिली असल्याने त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी धाव घेतली. पण ती लहान मुले तिथे नव्हती.

कचऱ्यातून सोन्याचा गटारात प्रवास

यानंतर त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता काही सापडले नाही. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी गोरेगावमधून संबंधित मुले आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा शोध घेतला. यावेळी त्यांनी आपण पावाची पिशवी कचऱ्यात फेकून दिली असल्याचे सांगितले. पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगात शोधले असता ती पिशवी सापडली नाही. यानंतर सीसीटीव्ही तपासले असता उंदीर ती पिशवी गटारात घेऊन गेल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण गटाराची पाहणी केली असता ती पिशवी आणि सोने सापडले.

या सोन्याची किंमत तब्बल पाच लाख रुपये आहे. काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी हे सर्व सोने या महिलेकडे सोपवल्याने तिचा जीव अखेर भांड्यात पडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in