

मुंबई : गुन्हेगारांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना पोलिसांनीही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई पोलीस दलाला तंत्रज्ञानाचे बळ देऊन सक्षम केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज आयोजित कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानसंवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन आणि लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिसांनी तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर भर दिला असून डिजिटल सुविधा, एआय आणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून तपास अधिक होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
पोलिसांना डिजिटल ओळखपत्र
पोलिसांना देण्यात आलेले डिजिटल ओळखपत्र हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची डिजिटल ओळख ठरणार आहे. कार्ड स्कॅन केल्यानंतर संबंधित पोलिसाची माहिती मिळू शकेल. त्यामुळे तो खरा पोलीस अधिकारी आहे की बनावट, हे नागरिकांना पडताळता येणार आहे तसेच देशातील पहिली अँटी नार्कोटिक व्हॅन अमली पदार्थविरोधातील कारवाईसाठी उपयुक्त ठरणार आहे.
'तपास सारथी' मुळे आरोपपत्रातील त्रुटी शोधणार
राज्यातील तपास प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'तपास सारथी' प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतची प्रक्रिया आणि पुराव्यांचे व्यवस्थापन एकाच प्रणालीत आणण्याचा यामागील उद्देश आहे. न्यायालयांचे पूर्वीचे निकाल, पुराव्यांचे मूल्यमापन आणि तपासातील त्रुटींचा अभ्यास करून आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच संभाव्य कमतरता शोधता येतील, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
या सुविधांचे लोकार्पण
डिजी आयडी स्मार्ट कार्ड : मुंबई पोलिसांची अधिकृत ओळख करून देणारे स्मार्ट ओळखपत्र
टॅबचे वितरण : पोलिसांच्या विविध अधिकृत अॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठी सर्व अंमलदार आणि अधिकारी यांना दैनंदिन कामकाज अधिक सुलभ, जलद तसेच कार्यक्षम करण्यासाठी टॅबची सुविधा
अँटी नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन व्हॅन : अमली पदार्थविरोधी कारवाई आणि तपास अधिक प्रभावी तसेच गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक तपास वाहन
मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली (एमपीआयएस) : पोलीस दलातील विविध कामकाज एकाच डिजिटल प्रणालीद्वारे अधिक सुलभ, समन्वयपूर्ण आणि गतिमान करण्यासाठी एकात्मिक कार्यप्रणाली
सिटीझन अॅप : नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा आणि सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेता यावा यासाठी सिटीझन अॅपची सुविधा