

मुंबई : मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत ४० हजार नवीन शासकीय पोलीस सेवा निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. याशिवाय मुंबईत ९३ अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशी नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. याशिवाय पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी येत्या सात दिवसांत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.
विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील वादळी चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुंबई पोलीस दल हे राज्यातील सर्वात मोठे दल आहे. मात्र, पोलिसांच्या निवासाचा प्रश्न आजही गंभीर आहे. अनेक कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध असली तरी त्यापैकी सुमारे ९० टक्के घरे निर्धारित निकषांपेक्षा लहान आहेत. अनेक इमारती अत्यंत जुन्या झाल्या असून त्यांचे पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस दलासाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील पोलीस विभागाच्या मालकीचे सर्व भूखंड तपासण्यात आले आणि त्यातील ७४ मोक्याचे भूखंड विकासासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या भूखंडांवर टप्प्याटप्प्याने पोलिसांसाठी सुमारे ४० हजार शासकीय निवासस्थाने उभारली जातील. या प्रकल्पामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक, प्रशस्त आणि दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले...
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी ७३३ कोटी रुपयांच्या योजनेची आखणी
‘डीजी लोन’ योजनेतून ५ हजार ११५ पोलिसांना सुमारे १ हजार ७५९ कोटींचे कर्ज वितरित
देशात गुन्हेगारीच्या संदर्भात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत
अमली पदार्थविरोधी मोहिमेत २४ पोलीस निलंबित, तर १८ पोलिसांवर बडतर्फीची कारवाई
९३ अत्याधुनिक पोलीस ठाणी उभारणार
फडणवीस यांनी आपल्या उत्तरात मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या अवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली. अनेक पोलीस ठाण्यांच्या इमारती जुन्या असून आधुनिक पोलिसिंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुंबईत ९३ नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. ही सर्व पोलीस ठाणी एकसमान आराखड्यानुसार आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नागरिकांसाठी सुलभ सेवा, तपासासाठी आवश्यक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.