

मुंबई : कुत्र्याला मारल्यामुळे शिक्षा म्हणून पोलिस कर्मचाऱ्यालाच उठाबशा काढायला भाग पाडल्याचा दावा करणारा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ४८ सेकंदांचा व्हिडिओ ‘Defence Brat’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात किंवा नवी मुंबईच्या पनवेल येथे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. तथापि, अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही नेटकऱ्यांनी संबंधित व्यक्ती पोलिस कर्मचारी नसून सुरक्षारक्षक असल्याचा अंदाजही बांधला आहे.
“कुत्र्याला काही झालं तर कारवाई होईल” अशी धमकी
व्हिडिओमध्ये, गर्दीत काही नागरिक संबंधित खाकी वर्दीतील कर्मचाऱ्याला जाब विचारताना दिसतात. ऑडिओनुसार, काठीने एका कुत्र्याला मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्हिडिओत दोन व्यक्ती जोरजोरात ओरडताना ऐकू येतात. त्यातील एक जण संतप्त आवाजात म्हणतो, “त्याला काही झालं तर तुझ्यावर कारवाई होईल. मी तुला आधीच इशारा देतोय. त्यामुळे प्रार्थना कर की त्याला काही होऊ नये.” यानंतर याच व्यक्तीने त्या कर्मचाऱ्याला उठाबशा काढण्याचे आदेश दिले. उठाबशा काढताना कर्मचाऱ्याला माफीही मागण्यास सांगितले. "आजपासून मी कुत्र्याला मारणार नाही, मी माझ्या वर्दीचा गैरवापर करणार नाही", असे उठाबशा काढणारा कर्मचारी व्हिडिओमध्ये वारंवार बोलताना दिसतोय. तर, व्हिडिओच्या शेवटी संबंधित कर्मचारी त्या व्यक्तींच्या पायाला हात लावून माफी मागताना दिसतो.
ही पोलिसांची थट्टा, नेटकऱ्यांचा संताप
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत. पोलिस कर्मचाऱ्याला सार्वजनिकरित्या अपमानित करण्याच्या प्रकारावर अनेकजणांनी आक्षेप घेतला आहे. ही पोलिसांची थट्टा आहे, अशा अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तर, काहीजण संबंधित व्यक्ती पोलिस कर्मचारी नसून सुरक्षारक्षक असल्याचेही म्हणत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हिडिओतील आरोपांची सत्यता आणि घटनेची पार्श्वभूमी तपासली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.