Mumbai : प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याने १०६ बांधकामांना ‘स्टॉप वर्क नोटीस’; रेल्वे पूल बांधकाम, एसआरए, म्हाडा प्रकल्पांचा समावेश

ही कारवाई केवळ बांधकाम क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून नियमांचे पालन न करणाऱ्या बेकरी युनिट्सवरही ‘कार्य स्थगिती’ नोटीस देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. धूर, इंधन वापर आणि उत्सर्जन मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
Mumbai : प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याने १०६ बांधकामांना ‘स्टॉप वर्क नोटीस’; रेल्वे पूल बांधकाम, एसआरए, म्हाडा प्रकल्पांचा समावेश
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणारे प्रकल्प महापालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या १०६ बांधकाम प्रकल्पांना महापालिकेने ‘स्टॉप वर्क नोटीस’ बजावली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये खासगी बांधकामांसह रेल्वे पूल बांधकाम, एसआरए प्रकल्प, म्हाडा प्रकल्प इत्यादी बांधकाम प्रकल्पांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यापुढे याबाबत नियमित पाहणी सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्या बांधकामांना नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या उपाययोजना व कार्यवाहींचा भाग म्हणून पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ (वायू गुणवत्ता मापन प्रणाली) कार्यान्वित करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. तर १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसविण्याचे आदेशदेखील यापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र, काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांनुसार अत्यावश्यक असणारी ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसवली नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकल्पांना काम बंद करण्याच्या नोटिसा तातडीने काढण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. सध्या मुंबईत एकूण २८ ठिकाणी 'सतत वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे' कार्यरत आहेत. त्यापैकी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारीत १४ केंद्रे, भारतीय उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थेअंतर्गत ९ केंद्रे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील ५ केंद्रे कायर्रत आहेत. ही सर्व केंद्रे प्रमाण दर्जाची केंद्रे असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोजमाप, कॅलिब्रेशन, गुणवत्ता हमी आणि डेटा प्रमाणिकरणासाठी राष्ट्रीय मानके व प्रोटाकॉलचे पालन करतात. या केंद्रांद्वारे उपलब्ध होणारी आकडेवारी ही केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या संकेतस्थळासह ‘समीर’ या ‘भ्रमणध्वनी ॲप’वर उपलब्ध आहे. कृपया नागरिकांनी आपल्या परिसरातील हवा गुणवत्तेची आकडेवारी बघण्यासाठी या अधिकृत ॲपचा वापर करावा, असे आवाहन यानिमित्त महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून नियम पाळणाऱ्यांना सहकार्य, तर नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पालिकेने याआधीच जाहीर केली आहे. विविध स्तरातील उपाययोजनांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होत असून, बहुतेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ वा ‘मध्यम’ श्रेणीत आहे. वायूप्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेची ही कारवाई नियमितपणे व अधिकाधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचेही उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे यांनी नमूद केले आहे.

... तर बेकऱ्यांवरही कडक कारवाई

वायूप्रदूषण करणी पुढील न्यायालयीन सुनावणी शुक्रवारी होणार आहे. पूर्वनियोजित कृती आराखड्यानुसार प्रत्यक्ष स्थळभेटी व पाहणी सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सर्व विभागस्तरीय पथकांना दिले आहेत. याअंतर्गत प्रत्यक्ष तपासणी, नोंदवही निरीक्षण आणि तत्काळ कारवाईवर भर देण्यात येत आहे. ही कारवाई केवळ बांधकाम क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून नियमांचे पालन न करणाऱ्या बेकरी युनिट्सवरही ‘कार्य स्थगिती’ नोटीस देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. धूर, इंधन वापर आणि उत्सर्जन मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in