

मुंबई : मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून मुंबई उपनगराचा विकास झपाट्याने होत आहे. सद्यस्थितीत मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. भविष्यात आणखी वाढतच जाणार असून २०४१ पर्यंत मुंबईची १ कोटी ७२ लाखांच्या घरात पोहोचेल, असे जाणकार सांगतात. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणी वाढ होणार असून ६,५३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. गारगाई, समुद्राचे खारे पाणी गोडे करणे असे पाण्याचे नवीन स्रोत निर्माण केले जात असले तरी ते किती यशस्वी होतील, याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न पेटणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. पुढील १५ वर्षांत म्हणजेच २०४१ मध्ये मुंबईची लोकसंख्या दोन कोटींच्या घरात असेल. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याच्या मागणीत लक्षणीय वाढ होणार असून पुढील १५ वर्षांत तब्बल २ हजार ८९१ दशलक्ष लिटर आणखी पाण्याची गरज भासणार आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली असून हे सगळे प्रकल्प पुढील तीन ते चार वर्षांत पूर्ण होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
पाण्याची मागणी वाढतीच
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या घरात आहे. हीच लोकसंख्या २०४१ मध्ये १ कोटी ७२ लाख असेल, असा आकडा पालिकेच्या जल विभागाने अंदाजित केला आहे. २०४१ च्या आकडेवारीनुसार पिण्याच्या
पाण्याच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई (४४० दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी), पिंजाळ (८६५ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प (१,५८६ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) हे नवीन स्रोत विकसित करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी २,८९१ दशलक्ष लिटर्स इतकी वाढ होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
वातावरण बदल, पाणी वाया गेल्याने टंचाई
वातावरणीय बदलामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडते किंवा अपेक्षाच्या तुलनेत कमी बरसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून भारतासारख्या प्रगतशील देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दरवर्षी पाणीबाणीची स्थिती उद्भवते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी नियोजन पद्धतीने स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होतो. मात्र, भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार याचे संकेत मिळत असताना ही मुंबईकर पाणी वाया घालवण्यात धन्यता मानतात.
चोरी, गळतीमुळे पाण्याची नासाडी
मुंबईला सद्यस्थितीत दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून २७टक्के पाणी चोरी व गळतीमुळे वाया जाते. तर भविष्यात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गरज वाढणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, पाणी आडवा, पाणी जिरवा, पाण्याची गरज लक्षात घेता लोकांमध्ये जागृती केली जाते. मात्र मुंबईत पाण्याची नासाडी पहाता मुंबईकरांना 'पाणी हे अनमोल' जल हैं, पाण्याशिवाय सजीव जगू शकत नाहीत, याचा विसर पडला आहे.