
मुंबई : मुंबईत सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे खड्ड्यातून मार्ग काढत असताना अपघात झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. पवई आयआयटी मार्केटच्या मेन गेटवर एक बेस्टची बस आली असता जवळून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा खड्यांमुळे तोल गेला आणि दोघेही बेस्ट बसच्या खाली आले. या घटनेत दुचाकीस्वारापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलीस व बेस्ट उपक्रमाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
विक्रोळी आगाराची ओलेक्ट्रा कंत्राटदाराची वातानुकूलित बस (८६८७) मार्ग क्रमांक ए-४२२ ही बसचालक उत्तम जिजाबा कुमकर हे विक्रोळी आगार येथून वांद्रे बसस्थानक पश्चिमेकडे निघाले होते. सकाळी ६.५५ वाजता ही बस आयआयटी मार्केटच्या मुख्य गेट बस स्टॉपजवळ आली असता (एमएच-०२-जीजी-६५०२) क्रमांकाची स्कुटी खड्डे वाचवण्याच्या प्रयत्न करत असताना उजव्या बाजूच्या एका कारचालकाने त्याला कट मारली. त्यामुळे स्कुटीचालक आणि पाठीमागील दुचाकीस्वार घसरून रस्त्यावर पडले. त्यातील एक दुचाकीस्वार डाव्या बाजूला पडला आणि त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली, तर दुसरा दुचाकीस्वार देवांश भरत पटेल (२२) उजव्या बाजूला पडला आणि बेस्ट बसच्या डाव्या बाजूच्या मागील टायरखाली सापडला. पोलिसांनी त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसरा दुचाकीस्वार स्वप्नील विश्वकर्मा (२३) जखमी झाला असून त्याला जवळच्या पवईतील खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.