

मुंबई : शहरात सर्वत्र सिमेंटचे रस्ते करून मुंबईला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन अजूनही कागदावरच असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा शहरवासीयांना येणार आहे. शहर व दोन्ही उपनगरातील खड्डे भरण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यंदा दोन ते तीन हजार मेट्रिक टन मास्टिकचा वापर करण्यात येणार आहे.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कोडे न सुटणारे. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट क्राॅकिटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. गेल्या दोन वर्षापासून याबाबत अनेक आश्वासने दिली गेली आहेत. पण संपूर्ण सिमेटीकरण अजूनही होऊ शकलेले नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील सुमारे २,११८ कि.मी. रस्त्यांची देखभाल केली जाते. मुंबई ही देशाचा आर्थिक कणा आणि जागतिक चेहरा असल्याने, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शाश्वत, टिकाऊ व पर्यावरणस्नेही रस्ते पायाभूत सुविधा बनविण्याच्या दिशेने सातत्याने पावले टाकत आहे. त्यामुळे पुढील वर्ष दोन वर्षांत मुंबईतील रस्ते सिमेंट काॅंक्रीकटचे होतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १०० कोटींचा खर्च करण्यात येणार असून लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
यंदा दोन हजार मेट्रिक टन मास्टिकचा वापर
गेल्या वर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला होता. गेल्या वर्षी तीन हजार मेट्रिक टन मास्टिकचा वापर करण्यात आला होता. मात्र यंदा खड्डे बुजवण्याच्या खर्चात बचत झाली असून मास्टिकही दोन हजार मेट्रिक टन वापरण्यात आले.
सेंट्रल एजन्सीचे काम
मुंबईतील मोठ्या रस्त्यावर खड्डे पडल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंत्राटदारांच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचे काम केले जाते. मात्र मुंबई महापालिकेच्या विभाग स्तरावर सेंट्रल एजन्सीमार्फत खड्डे बुजवण्यात येतात, असेही अधिकाऱ्याने सांगितले.