
मुंबई / पूनम पोळ
मुंबईत पहिल्याच पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यांमधून, असा प्रश्न पडला आहे. पहिल्याच पावसात सायन, धारावी, कुर्ला, माटुंगा, परळ आणि लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर खड्डे पडल्याचे दिसून आले. यामुळे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात बुडाले असल्याची टीका मुंबईकरांकड़ून होत आहे. याबाबत पालिका अधिकार्यानी, सोमवारी पडलेला अवकाळी पाऊस असल्याने पालिकेकडे खड्ड्यांची माहिती नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार केला.
मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेने १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार असल्याचे सांगितले होते. गेल्यावर्षी खड्डे बुजविण्यासाठी १५५ कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा शहरातील सात परिमंडळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी ७९ कोटी रुपये तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पालिकेने म्हटले होते. यासाठी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून पावसाळ्याआधी काही महिनेआधी खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली गेली. यासाठी खड्डे भरणारे कंत्राटदार सप्टेंबरपर्यंत त्याचे काम करणार असल्याची माहिती आहे. असे असले तरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतरही खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईकरांचा सामना खड्ड्यांशी होणार आहे.
मुंबईत पडलेल्या पहिल्याच पावसात नव्याने बनवण्यात आलेल्या रस्त्यांवर तसेच जुन्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायाला मिळत आहे. यामध्ये मुंबईच्या सखल भागात पाणी भरणाऱ्या ठिकाणाचा अधिक समावेश आहे. तसेच मुंबईतील सायन, धारावी, कुर्ला, माटुंगा, परळ, भायखळा या भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे चित्र दिसले. परिणामी, पावसात अडकलेल्या आणि रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या मुंबईकरांचे खड्ड्यांमुळे अतोनात हाल झाले. यामुळे पावसाळ्यात खड्डे पडल्यास कंत्राटदाराला रोख दंड करण्यात येईल असे म्हणणारी पालिका कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत.
मागील दोन ते तीन महिन्यापासून आमच्या विभागात रस्त्याचे काम सुरु आहे. वापरात असलेला चांगला रस्ता खोदून पालिकेने नवीन रस्ते बांधायला सुरुवात केली. मात्र, अद्यापही या रस्त्यावरील काम पूर्ण झाले नाही. यामुळे अवकाळी पावसादरम्यानच आम्हाला खड्ड्यांचे दर्शन झाले असल्याचे सांगत माटुंगा पश्चिम येथे राहणाऱ्या सुमन बेलाड यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळा पूर्व रस्त्यांची कामे केली जातात. पण त्या कामांची पोलखोल पहिल्याच पावसात होते. सोमवारी झालेल्या पावसात बैलबाजार, जरीमरी कुर्ला कमानीच्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आणि दरवर्षी या भागातले खड्डे बुजवले तरी या ठिकाणी खड्डे पडतात. यामुळे पालिका आणि त्यांचे कंत्राटदार येथे राहणाऱ्या लोकांना गृहीत धरत असल्याची टीका येथील विशाल चौफुले यांनी केली.
खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापर
मास्टिक तंत्रज्ञानामुळे खड्डे उखडत नसल्यामुळे मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. मुंबई पालिकेच्या अखत्यारित असलेल्या सुमारे दोन हजार किमीच्या रस्त्यांवर हे धोरण राबवण्यात आले. मात्र, असे असतानाही रस्त्यांवर पडलेले खड्डे हे कंत्राटदाराने केलेली कामचोरी आहे आणि यासाठी पालिका जबाबदार कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करेल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.