मुंबई : मान्सून पूर्व आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यावर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कुठल्या रस्त्यावर खड्डे, याचा शोध घेण्यासाठी रस्ते विभागातील अभियंत्यांनी टू व्हीलरवर फिरा, असे आदेश दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. दरम्यान, चारचाकी वाहनातून फिरल्यास कुठल्या रस्त्यावर खड्डे हे लक्षात येत नसल्याने टू व्हीलरवर फिरून ज्या रस्त्यांवर खड्डे दिसतील, ते वेळीच बुजवा, असे आदेश दिल्याचे बांगर म्हणाले.
पावसाचे आगमन पुढील दिवसांत होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी नालेसफाईसह खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनीही सूचना केल्या आहेत की, सेंट्रल एजन्सी आणि वॉर्ड स्तरावर खड्डे बुजवण्याची होणारी कामे यात वाद न घालता खड्डे बुजवण्यास प्राधान्य द्यावे. एखाद्या ठिकाणी खड्डे बुजवण्याकडे कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्यास, तत्काळ याची माहिती उपलब्ध करावी, जेणेकरून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणे शक्य होईल. यासाठी पालिकेच्या सातही परिमंडळातील उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांनी दररोज व्हिजिट करत आढावा घ्यावा, असे निर्देश दिल्याचे ते म्हणाले.
मान्सूनपूर्व कामे सध्या जोरात सुरू असून पाऊस जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत कामे सुरू ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच रस्ते विभागातील अभियंत्यांनी स्वत: दुचाकी किंवा मोटारसायकलवर फिरून खड्डा पडल्याचे निदर्शनास येताच, ते तत्काळ बुजवण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिल्याचे अभिजित बांगर यांनी सांगितले.
खड्ड्यांच्या तक्रारीसाठी अपडेट ॲप
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व व पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचे काम सुरू असते. पालिकेची यंत्रणा वॉर्डस्तरावर खड्ड्यांची माहिती घेत ते बुजवत असते. परंतु आपल्या प्रभागातील रस्त्यावर खड्डा पडल्यास त्याची तक्रार करण्यासाठी तयार करण्यात आलेला पॉट होल ट्रॅकिंग सिस्टिमचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत आहे. याआधी तक्रारकर्त्याला १० ते १२ ठिकाणी नोंद करावी लागत होती. मात्र आता ॲपवर चार-पाच ठिकाणी नोंदणी करता येणार आहे. कुठल्या रस्त्यावर खड्डा पडला, त्या रस्त्याचे लोकेशन, खड्ड्यांचा फोटो, वॉर्ड अशी चार ते पाच वेळा नोंदणी करता येणार आहे, असेही ते म्हणाले.
खड्ड्यांसाठी एकूण २५० कोटी
मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी सहा हजार कोटींचे काम देण्यात आले आहे. मात्र यातील शेकडो कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी मार्चमध्ये १८० कोटी तर एप्रिलमध्ये सुमारे ६० कोटींहून अधिक खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. या कंत्राटाच्या अंतर्गत ९ मीटरपेक्षा कमी आणि जास्त रूंदी असलेल्या शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरही बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांवर बारीक लक्ष
पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतात. यासाठी प्रत्येक रस्त्यावरचा अपडेट घेणे आणि खड्डा पडल्यास कंत्राटदार, पालिकेची सेंट्रल एजन्सी व वॉर्ड स्तरावर बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी विशेष करून पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडण्याची तक्रार आणि निदर्शनास येत असल्यास, अशा ठिकाणी बारीक लक्ष ठेवा, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.