Mumbai : डेटिंग अ‍ॅपवर ओळख, मग व्हिडिओ कॉल, नंतर थेट भेटायला गेला अन्...; पवईत ४० वर्षीय व्यक्तीला आला भयावह अनुभव

नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडला. व्हिडिओ कॉलवर बोलणं झाल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदाराला चांदिवली बसस्टॉपजवळ भेटण्यास बोलावले. त्यानंतर विहार लेक रोडवरील हॉटेल एक्सप्रेस इनच्या मागील मोकळ्या जागेत...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबईतील पवई परिसरात डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यानंतर एका ४० वर्षीय व्यक्तीला धमकावून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडला असून, पवई पोलिसांनी २ जानेवारी रोजी चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) (दरोडा) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

एफआयआरनुसार, तक्रारदार अंधेरी पूर्वेतील रहिवासी असून खासगी कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास तो Grindr या डेटिंग अ‍ॅपवर चॅट करत होता. हे अ‍ॅप प्रामुख्याने समलैंगिक व्यक्तींकडून वापरले जाते. त्यानंतर अ‍ॅपवर ओळख झालेल्या एका व्यक्तीसोबत त्याचा व्हिडिओ कॉल झाला. त्या व्यक्तीने तक्रारदाराला चांदिवली बसस्टॉपजवळ भेटण्यास बोलावले. रात्री साडेनऊच्या सुमारास स्वतःला “ऋषिकेश” म्हणवणारा एक युवक दुचाकीवर आला आणि तक्रारदाराला विहार लेक रोडवरील हॉटेल एक्सप्रेस इनच्या मागील मोकळ्या जागेत घेऊन गेला.

त्या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या २० ते २२ वयोगटातील आणखी तीन तरुणांनी तक्रारदाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चोरी आणि अमली पदार्थ बाळगल्याचे खोटे आरोप करत पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली. त्यातील एका आरोपीने तुटलेली बिअरची बाटली तक्रारदाराच्या पोटाला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी त्याचा मोबाईल घेतला, Google Pay बॅलन्स पाहिला आणि पैसे उकळण्याचा कट रचला. तक्रारदाराला नातेवाईक आणि मित्रांना फोन करून पैसे मागण्यास भाग पाडण्यात आले. अखेर मोबाईल स्कॅनरद्वारे ऑनलाइन २० हजार रुपये उकळण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपींनी त्याला सोडून दिले.

पोलिस तपास सुरू

यानंतर तक्रारदाराने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘ऋषिकेश’ आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in