

मुंबई : मुंबईच्या पर्यटन वैभवात आज, रविवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अत्याधुनिक म्युझिकल फाऊंटन आणि लाईट अँड साऊंड शोचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अतिभव्य आणि अद्भुत स्वरूपात सादर केली जाणार आहे. यामुळे मुंबईत एक नवे पर्यटन स्थळ विकसित होणार आहे.
सुमारे ३० कोटी रुपये खर्चुन म्हाडाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला हा १८० मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन देशातील सर्वांत मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार आहे. येथे पर्यटकांसाठी दररोज तीन शो आयोजित करण्याचे नियोजन आहे.
पवई तलाव गणेश घाट येथे 'लाईट, साउंड आणि संगीतमय कारंजे शो' चा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन होणार आहे. मंत्री लोढा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
या प्रकल्पाची माहिती देताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांचा पराक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच मुंबईच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
संगीताच्या तालावर जलराशींचा पदन्यास
या म्युझिकल फाउंटनमध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ४० मीटर (१३० फूट) उंचीपर्यंत झेपावणारे वॉटर जेट्स आणि २७ फायर जेट्स हे या शोचे प्रमुख आकर्षण आहेत. याशिवाय रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्स यांमुळे पाण्याच्या विविध आकर्षक रचना साकारल्या जातील. संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा आणि वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन व लेझर प्रतिमा यांचा सुरेख संगम हा एक अविस्मरणीय दृक्-श्राव्य अनुभव ठरू शकेल.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास निधीतून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी म्हाडाची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार प्रकल्पाचे आवश्यक आराखडे व मांडणी महानगरपालिकेकडे सादर करण्यात आली असून, महानगरपालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. म्हाडा, महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या संचालन व देखभालीसंदर्भातील तरतुदींची अंमलबजावणी संबंधित करारानुसार केली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या विद्युत विभागाने दिली.
पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा !
प्रशिक्षित कर्मचारी, स्वतंत्र कंट्रोल रूम, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, अखंड वीजपुरवठ्यासाठी डीजी सेट, सुरक्षा रक्षक, प्राथमिक उपचार सुविधा, व्हीलचेअर यांसारख्या सुविधांच्या समावेशामुळे हा प्रकल्प जागतिक दर्जाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जलचरांच्या सुरक्षेची दक्षता !
या फाउंटनमध्ये केवळ एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येणार आहे. प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिला जाणार आहे. जलचरांना हानी पोहोचू नये, याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच ध्वनीची तीव्रता डेसिबल मयदित ठेवण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्यात आला असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
■ जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साऊंड शो. त्यात म्युझिकल फाऊंटन, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांचा समावेश आहे.
■ विशेष दृश्य परिणामांच्या (स्पेशल इफेक्ट्स) माध्यमातून तीन वेगवेगळ्या चित्रपटांतून मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, मुंबईची गौरवशाली कहाणी उलगडणार.
■ या म्युझिकल फाऊंटनमुळे तलावातील पाण्याचे एरेशन (पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया) होण्यास मदत. दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया. त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत.
■ परिसरातील तापमानात घट, बाष्पीभवनामुळे थंडावा आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा इत्यादी पर्यावरणीय लाभ अपेक्षित.