Mumbai : पवई तलावाची साठवण क्षमता ३२ टक्क्यांनी घटली; तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेचे प्रयत्न

पवई तलावाचे क्षेत्रफळ सुमारे ५५७ एकर असून त्याची परिघीय लांबी सुमारे १०.२ किलोमीटर आहे.
Mumbai : पवई तलावाची साठवण क्षमता ३२ टक्क्यांनी घटली; तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेचे प्रयत्न
Mumbai : पवई तलावाची साठवण क्षमता ३२ टक्क्यांनी घटली; तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेचे प्रयत्न'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : पवई तलावाचे क्षेत्रफळ सुमारे ५५७ एकर असून त्याची परिघीय लांबी सुमारे १०.२ किलोमीटर आहे. तलावाची मूळ पाणी साठवण क्षमता ५.४५५ दशलक्ष घनमीटर इतकी होती. मात्र, गाळ, माती, जलपर्णी आणि सांडपाण्यामुळे तलावाची साठवण क्षमता ३.६९३ दशलक्ष घनमीटरने कमी झाली आहे. परिणामी, तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे ३२.३० टक्क्यांनी घटली आहे.

मुंबईतील पवई तलावाचे पुनरुज्जीवन करून त्याची जलधारण क्षमता वाढविण्यासह तलावातील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी मुंबई महापालिकेने केली आहे. पर्यावरण आणि वनविभागाच्या नियमांचे पालन करून तलावाच्या परिसरात अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याबाबत तांत्रिक बाबींची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे तलावातील पाणी पिण्यासाठी किंवा इतर नागरी वापरासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी जल अभियंता, मलनिस्सारण प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प विभागांमार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. किनाऱ्यावरील १८ मोऱ्या व पावसाळी नाले यांमधून सांडपाणी तलावात येते. हे सांडपाणी रोखणे तसेच मलजल प्रक्रिया केंद्रामार्फत त्यावर प्रक्रिया करणे, अशी कामे करण्यात येत आहेत.

दररोज १०.३ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर

पवई तलावातील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने त्याचा वापर प्रामुख्याने इतर कामांसाठी केला जातो. तलावातील पाण्याचा वापर आरओ यंत्रणेद्वारे पाणी शुद्ध करण्यासाठी, बांधकामे, जनावरांचे खाद्य उत्पादन तसेच एल अँड टी कंपनीच्या औद्योगिक वापरासाठी केला जातो. या वापरासाठी दररोज सुमारे १०.३ दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते.

आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा पर्याय

गाळ, जलपर्णी हटवणे आणि सांडपाण्याचा प्रवाह रोखणे या कामांनंतर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा पर्याय तपासण्यात येणार आहे. यासाठी अभ्यास करून अहवाल सादर करण्याची विनंती आयुक्तांना करण्यात आली. तलावाच्या पुनरुज्जीवनानंतर पाण्याचा संभाव्य वापर, जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in