Mumbai : प्रभाकर शिंदेंना वाढदिवसाची भेट; स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध, शिक्षण समितीवर राजेश्री शिरवाडकर

मुंबई महापालिकेतील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे अनुभवी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची वर्णी लागणार आहे.
Mumbai : प्रभाकर शिंदेंना वाढदिवसाची भेट; स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध, शिक्षण समितीवर राजेश्री शिरवाडकर
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेतील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे अनुभवी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची वर्णी लागणार आहे. विशेष म्हणजे बुधवारी प्रभाकर शिंदे यांचा वाढदिवस आणि बुधवारीच शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवाडकर यांची वर्णी लागणार आहे, तर स्थायी समिती पाठोपाठ महत्वाच्या सुधार समिती अध्यक्षपदी संध्या दोशी यांची वर्णी लागली असून बेस्ट समिती अध्यक्षपदाची धुरा तृष्णा विश्वासराव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या दोन्ही नगरसेविकांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, ठाकरे सेनेचे नगरसेवक या चारही समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची बुधवारी सायंकाळपर्यंत चर्चा होती. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत ठाकरे सेनेकडून कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने ही अफवा पसरवल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.

मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समितींच्या अध्यक्षपदासाठी २० आणि २३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी प्रभाकर शिंदे यांनी, तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवाडकर यांनी आणि सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज पालिका चिटणीस मंजिरी देशपांडे यांच्याकडे दाखल केले. तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट उपक्रमाचे सचिव सुशील पवार यांच्याकडे अर्ज सादर केला. चारही उमेदवारांनी अर्ज भरला त्यावेळी भाजप - शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप - शिंदे सेनेसमोर ठाकरे सेना नरमली

महापौर व उपमहापौरपदासाठी ठाकरे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, अशी चर्चा होती. मात्र, महापौर व उपमहापौर मराठी असल्याने उमेदवार उभा केला नाही, असे ठाकरे सेनेच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते. तर स्थायी, सुधार, शिक्षण व बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे सेना उमेदवार रिंगणात उतरवणार, अशी चर्चा बुधवारी सायंकाळपर्यंत मुंबई महापालिकेत होती. मात्र, ठाकरे सेनेने उमेदवार उभेच केले नसल्याने भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर ठाकरे सेना नरमली, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.

logo
marathi.freepressjournal.in