Mumbai : प्रकल्पांसाठी ३३७ झाडांचा बळी? १८५ झाडे तोडणार, तर १५२ झाडांचे पुनर्रोपण

झोपडपट्टी पुनर्विकास योजना, रुग्णालयाची उभारणी आणि मुंबई कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पासाठी ३३७ झाडे बाधित होणार आहेत. यात १८५ झाडे तोडण्याची, तर १५२ झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

Mumbai : प्रकल्पांसाठी ३३७ झाडांचा बळी? १८५ झाडे तोडणार, तर १५२ झाडांचे पुनर्रोपण
Mumbai : प्रकल्पांसाठी ३३७ झाडांचा बळी? १८५ झाडे तोडणार, तर १५२ झाडांचे पुनर्रोपण 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास योजना, रुग्णालयाची उभारणी आणि मुंबई कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पासाठी ३३७ झाडे बाधित होणार आहेत. यात १८५ झाडे तोडण्याची, तर १५२ झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

प्रभादेवी-वरळी येथील पुनर्विकास योजना, शिवडीतील पुनर्विकास, कांदिवली पश्चिम येथील प्रस्तावित रुग्णालय, अंधेरी-जोगेश्वरीतील पुनर्विकास आणि गोरेगाव पश्चिम येथील कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पासाठी झाडे बाधित होणार आहेत.‌ प्रभादेवी-वरळी परिसरातील श्री साई सुंदरनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेसह अन्य २४ संस्थांच्या पुनर्विकासासाठी स्कायलार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडने ७६ झाडे तोडण्याची आणि २३ झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकल्पात इमारती, पोडियम, रॅम्प, नाला व रस्त्याशी संबंधित पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत.

अंधेरीत २२ झाडे तोडणार

अंधेरी पूर्व येथील जय हनुमान आणि तेजोमय सोसायट्या तसेच जोगेश्वरी पूर्व येथील विघ्नहर्ता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संयुक्त पुनर्विकासासाठी एल. के. हाऊसिंग एलएलपीने २२ झाडे तोडण्याची आणि आठ झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मागितली आहे. महापालिकेच्या पाहणीत या परिसरात १४८ झाडे आढळली होती. यापूर्वी काही झाडांबाबत परवानगी देण्यात आली असून सुधारित प्रस्तावात पूर्वीच्या मंजुरींनुसार नोंदवलेल्या १०६ झाडांचा समावेश आहे. त्यापैकी ९९ झाडे बाधित होण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

खोदकामाचा परिणाम होणार

शिवडीतील गणेशबाग एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेसह अन्य नऊ सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी सहाना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने ४१ झाडे तोडण्याची आणि ३० झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मागितली आहे. इमारतींचा पाया आणि तळघर उभारण्यासाठी खोदकाम करण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान परिसरात ७४ झाडे आढळली असून त्यापैकी ७१ झाडांवर प्रस्तावित खोदकामाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पूल विभागाने मागितली परवानगी

गोरेगाव पश्चिम येथील माइंडस्पेस गार्डनजवळील एमडीपी रोडवर मुंबई कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पासाठी तीन झाडे तोडण्याची आणि ३७ झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी महापालिकेच्या पूल विभागाने मागितली आहे. प्रस्तावित कोस्टल रोड इंटरचेंज पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या तात्पुरत्या प्रवेश पुलाच्या मार्गात ही झाडे येत आहेत. मुंबई महापालिकेच्या नोंदीनुसार तोडण्यासाठी प्रस्तावित असलेली तिन्ही झाडे मृत आहेत. त्यामुळे ती तोडणार आहेत.

कांदिवलीतील बाधित, पुनर्रोपित झाडे

कांदिवली पश्चिम येथे प्रस्तावित रुग्णालयाच्या इमारतीसाठी आकर आर्किटेक्ट्स अँड कन्सल्टंट्स यांनी ४३ झाडे तोडण्याची आणि ५४ झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मागितली आहे. संबंधित भूखंडावर पाहणीदरम्यान एकूण ४११ झाडे आढळली. त्यापैकी ९७ झाडे बांधकामामुळे बाधित होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित ३१४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in