मुंबईत गृहनोंदणीत विक्रमी वाढ; १४ वर्षांतील मालमत्ता नोंदणीचा उच्चांक

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता नोंदणीने मे २०२६ मध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या एकाच महिन्यात १२,३१५ मालमत्तांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यात ७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या १४ वर्षांतील मे महिन्यातील ही सर्वोच्च नोंदणी ठरली असून ग्राहकांकडून सातत्याने वाढणाऱ्या मागणीचे हे संकेत आहेत.
मुंबईत गृहनोंदणीत विक्रमी वाढ; १४ वर्षांतील मालमत्ता नोंदणीचा उच्चांक
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता नोंदणीने मे २०२६ मध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या एकाच महिन्यात १२,३१५ मालमत्तांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यात ७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या १४ वर्षांतील मे महिन्यातील ही सर्वोच्च नोंदणी ठरली असून ग्राहकांकडून सातत्याने वाढणाऱ्या मागणीचे हे संकेत आहेत. या नोंदणीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत मुद्रांक शुल्कापोटी १,०५१ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने दिली.

मालमत्ता नोंदणीत वार्षिक तत्त्वावर ७ टक्के वाढ झाली असली, तरी व्यवहारांच्या स्वरूपात झालेल्या बदलांमुळे मुद्रांक शुल्क संकलनात गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत १ टक्का किरकोळ घट झाली आहे. दुसरीकडे, मासिक पातळीवर तुलना केल्यास एप्रिल २०२६ च्या तुलनेत मे महिन्यात मालमत्ता नोंदणी १४ टक्के आणि महसूल संकलन ९ टक्के घसरले आहे. असे असले तरी मुंबईतील निवासी घरांची बाजारपेठ अत्यंत मजबूत स्थितीत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते.

या विक्रमी कामगिरीमुळे मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजी येत्या काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. स्थिर व्याजदर आणि पायाभूत सुविधांचा विकास यामुळे ग्राहकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनीही या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दशकभरातील मे महिन्यातील ही सर्वात मोठी वाढ असल्याने विकासक आणि गुंतवणूकदार या दोघांचाही उत्साह वाढला असून आगामी तिमाहीतही ही घोडदौड कायम राहण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील घरांच्या नोंदणीत वार्षिक तत्त्वावर झालेली ही वाढ रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीचा कल कायम असल्याचे स्पष्ट संकेत देते, असे मत ॲटमॉस्फियर लिविंगचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप आहुजा यांनी व्यक्त केले. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या चढउतारांच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदार आणि ग्राहक अशा मालमत्तांकडे आकर्षित होत आहेत ज्या भांडवलाच्या सुरक्षेसोबतच उच्च जीवनशैली देतात. हॉस्पिटॅलिटीवर आधारित गृहप्रकल्पांचे वाढते आकर्षण याचेच उदाहरण असून, ग्राहकांची मानसिकता आता केवळ घर खरेदी करण्यापलीकडे जाऊन एका दर्जेदार जीवनशैलीचा अनुभव घेण्याकडे बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या १४ वर्षांतील गृहनोंदणी

महिना,वर्ष - घरनोंदणी - महसूल (कोटी)

मे २०१३ - ६,०६८ - ३४३

मे २०१४ - ५,३९२ - ३३९

मे २०१५ - ५,२४० - ३०५

मे २०१६ - ५,८१५ - ३३९

मे २०१७ - ४,९९७ - ७४५

मे २०१८ - ६,६७२ - ४६५

मे २०१९ - ६,२७० - ५३४

मे २०२० - --- ---

मे २०२१ - ५,३६० - २६९

मे २०२२ - ९,८३९ - ७२७

मे २०२३ - ९,८२३ - ८३३

मे २०२४ - १२,००० - १,०३४

मे २०२५ - ११,५६५ - १,०६२

मे २०२६ - १२,३१५ - १,०५१

logo
marathi.freepressjournal.in