Mumbai : मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये करसंकलन; एकाच दिवशी ३९९ कोटींची वसुली

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता करसंकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे.
Mumbai : मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये करसंकलन; एकाच दिवशी ३९९ कोटींची वसुली
Mumbai : मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये करसंकलन; एकाच दिवशी ३९९ कोटींची वसुली
Published on

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता करसंकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. मालमत्ता करसंकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ७ हजार ३४१ कोटी रुपयांच्या सुधारित उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतके मालमत्ता करसंकलन केले आहे. ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ३९९ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल संकलित करून नवीन विक्रम देखील नोंदविण्यात आला आहे.

पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेतर्फे विविध नागरी सेवा व सुविधा पुरविल्या जातात. या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सक्षम आर्थिक स्रोतांची आवश्यकता असते. त्या दृष्टीने, मालमत्ता कर हा एक अत्यंत महत्त्वाचा, स्थिर आणि विश्वासार्ह महसुली स्रोत म्हणून विशेष अधोरेखित होतो.

या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली, करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता करसंकलनासाठी व्यापक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले.

पालिका सार्वत्रिक निवडणुकीचे व्यापक व जबाबदारीपूर्ण कामकाज यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरही, करनिर्धारण व संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनासाठी उल्लेखनीय समर्पण, सातत्य आणि अपेक्षेपेक्षा अधिक परिश्रम घेतले; ही बाब निश्चितच विशेष उल्लेखनीय आणि अत्यंत कौतुकास्पद आहे.

नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. करभरणा सुलभ व्हावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आणि ऑनलाइन भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करून मागील थकबाकी वसुलीसाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे मालमत्ता करसंकलन अधिक परिणामकारक आणि गतिमान झाले.

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७,३४१ कोटी रुपये मालमत्ता करसंकलनाचे सुधारित उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्धारित कालावधीदरम्यान ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या १०३.६८ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात ३०१ कोटी १३ लाख रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.

प्रशासकीय विभागनिहाय कामगिरीचा विचार करता, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षामध्ये के. पूर्व (७१९ कोटी २३ लाख रुपये), जी. दक्षिण (६७० कोटी ६४ लाख रुपये), के. पश्चिम (६२२ कोटी १६ लाख रुपये), एच. पूर्व (५७७ कोटी ७८ लाख रुपये) आणि एच. पश्चिम (५३६ कोटी ५५ लाख रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता करसंकलन नोंदवले आहे.

विधी समिती अध्यक्षांनी केले कौतुक

महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७,३४१ कोटी रुपये इतके उद्दिष्ट निश्चित केले होते. तथापि, करनिर्धारण व संकलन विभागाने त्यापेक्षा अधिक म्हणजेच ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित केले. तसेच, जल अभियंता आणि अनुज्ञापन खात्यानेही २०२५-२६ या आर्थिक वर्षात देयके आणि महसुलाच्या बाबतीत उत्तम कामगिरी बजावली. याबद्दल या विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे श्रीमती कारकर यांनी यावेळी कौतुक केले. तसेच, भविष्यातही अशीच कामगिरी करित राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

अशी झाली करवसुली

शहर विभाग

  • ए विभाग २७० कोटी ७ लाख रुपये

  • बी विभाग ४७ कोटी ३१ लाख रुपये

  • सी विभाग ९० कोटी १४ लाख रुपये

  • डी विभाग २९९ कोटी ५३ लाख रुपये

  • ई विभाग १५० कोटी ८ लाख रुपये

  • एफ दक्षिण विभाग १६५ कोटी ९० लाख रुपये

  • एफ उत्तर विभाग १५७ कोटी ७६ लाख रुपये

  • जी दक्षिण विभाग ६७० कोटी ६४ लाख रुपये

  • जी उत्तर विभाग २५१ कोटी १७ लाख रुपये

पश्चिम उपनगरे

  • एच पूर्व विभाग ५७२ कोटी ७८ लाख रुपये

  • एच पश्चिम विभाग ५३६ कोटी ५५ लाख रुपये

  • के पूर्व विभाग ७१९ कोटी २३ लाख रुपये

  • के पश्चिम विभाग ६२२ कोटी १६ लाख रुपये

  • पी दक्षिण विभाग ३७२ कोटी २३ लाख रुपये

  • पी उत्तर विभाग २७७ कोटी २२ लाख रुपये

  • आर दक्षिण विभाग २८८ कोटी ८१ लाख रुपये

  • आर मध्य विभाग २९४ कोटी ९४ लाख रुपये

  • आर उत्तर विभाग ९७ कोटी ४१ लाख रुपये

पूर्व उपनगरे

  • एल विभाग ३०४ कोटी ५७ लाख रुपये

  • एम पूर्व विभाग ११३ कोटी ९३ लाख रुपये

  • एम पश्चिम विभाग १८४ कोटी ७० लाख रुपये

  • एन विभाग २४२ कोटी ३० लाख रुपये

  • एस विभाग ३९८ कोटी ४७ लाख रुपये

  • टी विभाग २१३ कोटी ४४ लाख रुपये

logo
marathi.freepressjournal.in