मुंबईत दुसऱ्या दिवशीही जोरदार निदर्शने; आतापर्यंत ९०० जणांवर गुन्हे, ठाकरे गट कायदेशीर मदत देणार

'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच दिल्लीतील पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत विरोधी पक्ष आणि इतरांकडून निदर्शने करण्यात आली.
मुंबईत दुसऱ्या दिवशीही जोरदार निदर्शने; आतापर्यंत ९०० जणांवर गुन्हे, ठाकरे गट कायदेशीर मदत देणार
मुंबईत दुसऱ्या दिवशीही जोरदार निदर्शने; आतापर्यंत ९०० जणांवर गुन्हे, ठाकरे गट कायदेशीर मदत देणार(Photo-X)
Published on

मुंबई : 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच दिल्लीतील पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत विरोधी पक्ष आणि इतरांकडून निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनात अटक झालेल्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे कायदेशीर मदत देण्यात येणार आहे. पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल ९०० हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले आहे. चैत्यभूमी परिसरातील घटनेबाबत ३ स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून ५० हून अधिक आंदोलकांवर कारवाई सुरू आहे.

या आंदोलनाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दादरच्या शिवाजी पार्कवर निदर्शने केली. तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने डोंगरी भागात स्वतंत्र निदर्शने केली.

शिवाजी पार्क येथील आंदोलनाच्या ठिकाणी एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अकोला जिल्ह्यातून आले असून एका स्वच्छ शिक्षण व्यवस्थेची मागणी करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

"या आंदोलनात अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी मी तरुण असतो तर बरे झाले असते, आणि जर माझा मृत्यू झाला तर माझ्या मुलांनी माझा मृतदेह नेऊ नये आणि मला येथेच पुरून टाकावे., अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, एका महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सिद्धार्थ वसाहतीमधील स्थानिक रहिवाशांच्या एका गटाने निदर्शने काढल्यामुळे मुंबईतील चेंबूर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी पूर्व द्रुतगती मार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, महामार्ग रोखण्यापूर्वीच पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना अडवले, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपले आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी केल्याने काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत किंवा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, त्यांना कायदेशीर मदत पुरवण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाने घेतला आहे. महाराष्ट्रातील अशा विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी shivsenaubtlegal@gmail.com या ईमेल आयडीवर पक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

तसेच वकिलांनी अशा प्रकरणांमध्ये प्रो-बोनो (विनामोबदला) युक्तिवाद करावा आणि विद्यार्थी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in