मुंबईत पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढीचा प्रस्ताव

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाने मुंबईतील सार्वजनिक पार्किंग सुविधांच्या शुल्कात चाळीस टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
मुंबईत पार्किंग शुल्कात  ४० टक्के वाढीचा प्रस्ताव
मुंबईत पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढीचा प्रस्ताव'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाने मुंबईतील सार्वजनिक पार्किंग सुविधांच्या शुल्कात चाळीस टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी मिळाली असून तो प्रत्यक्षात आला तर तब्बल दहा वर्षांनी हे दर वाढणार आहेत.

सुधारित प्रस्ताव आता महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर, तो वर्क्स कमिटी आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाईल.

सार्वजनिक पार्किंगचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते: विकासकांनी अतिरिक्त FSI च्या बदल्यात बांधलेली बहुमजली पार्किंग स्ट्रक्चर्स, रस्त्यावरील पे-अँड-पार्क (अल्पकालीन वापरासाठी रस्त्याच्या कडेला असलेले शुल्क-आधारित पार्किंग आणि रस्त्याबाहेरील पे-अँड-पार्क (वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यापासून दूर असलेले स्वतंत्र भूखंड यांचा त्यात समावेश होतो.

बीएमसीने २ जानेवारी २०१५ रोजी सर्वसमावेशक पे-अँड-पार्क धोरण मंजूर केले होते, ज्यामध्ये पार्किंग शुल्कात ३०० ते ४००% वाढ सुचवण्यात आली होती. मात्र, तीव्र सार्वजनिक आणि राजकीय विरोधामुळे राज्य सरकारने जानेवारी २०१५ मध्ये या निर्णयाला स्थगिती दिली. फेब्रुवारी २०१७ मध्ये ही स्थगिती उठवण्यात आली, त्यानंतर पालिकेने दक्षिण मुंबईतील 'ए' वॉर्डपासून सुधारित दर लागू करण्यास सुरुवात केली. ए, बी आणि सी अशा तीन झोनमध्ये विभागलेले हे धोरण मार्च २०२१ मध्ये संपणार होते, परंतु तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेने त्याला मुदतवाढ देण्यात आली होती.

एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, "जवळपास एका दशकानंतर विद्यमान पे-अँड-पार्क धोरणात बदलाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याला तत्त्वतः मान्यता मिळाली असून आता सविस्तर टिपणी तयार केली जाईल." हे सुधारित दर विद्यमान आणि भविष्यातील सर्व पार्किंग कंत्राटांमध्ये समाविष्ट केले जातील.

दरम्यान, मुंबईतील पार्किंगच्या जागांचा नकाशा तयार करण्यासाठी बीएमसी तीन कोटी रुपयांचा डिजिटल डॅशबोर्ड विकसित करत आहे. एका स्मार्ट पार्किंग ॲप आणि वेबसाइटद्वारे नागरिकांना पार्किंगच्या उपलब्धतेबद्दल रिअल-टाइम माहिती मिळेल. यामध्ये फास्टॅग आधारित पेमेंट सुविधा देखील असेल, ज्यामुळे जादा शुल्क आकारणी आणि पार्किंग निधीचा गैरवापर थांबवण्यास मदत होईल.

कुठे लागू होणार नवीन दर?

हे सुधारित पार्किंग दर मुंबईतील पालिकेच्या सर्व पार्किंग सुविधांना लागू होतील, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:

  • ३७ सार्वजनिक वाहनतळ

  • २६ रस्त्यावरील 'पे-अँड-पार्क' क्षेत्र

  • ३५० हून अधिक रस्त्याबाहेरील 'पे-अँड-पार्क' सुविधा

logo
marathi.freepressjournal.in