

मुंबई : मुंबई विभागातील सर्व परवानाधारक कॅटरिंग स्टॉल्स आणि युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पश्चिम रेल्वे’ने समान गणवेश अनिवार्य केला आहे. रेल्वे स्थानकांनावरील खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि सादरीकरण सुधारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या १० सप्टेंबरपासून सर्व कॅटरिंग कर्मचाऱ्यांना कामावर असताना डिस्पोजेबल हातमोजे आणि डोक्यावर जाळी वापरणे बंधनकारक असणार आहे. बोईसर स्थानकात वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून समोसे विकले जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील सर्व कॅटरिंग युनिट्सची तपासणी तीव्र केली आहे. वरिष्ठ विभागीय व्यावसायिक रेल्वे व्यवस्थापक आदिश पठानिया यांनी सर्व परवानाधारक कॅटरिंग चालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विहीत गणवेश आणि स्वच्छतेच्या मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्टेशन व्यावसायिक व्यवस्थापक आणि व्यावसायिक निरीक्षकांना त्यांच्या पाहणीदरम्यान गणवेश आणि स्वच्छतेच्या पद्धती तपासण्याचे आणि थेट विभागीय कार्यालयाकडे अहवाल पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानकांवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची स्वच्छता याचा थेट परिणाम प्रवाशांच्या अनुभवावर होतो. यामुळे स्थानकांतील कॅटरिंग आउटलेट्सचे दर्जा सुधारण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून हे प्रयत्न केले जात आहेत.
गणवेशामुळे कर्मचाऱ्यांना अधिक व्यावसायिक स्वरूप प्राप्त होईल, तर हातमोजे आणि डोक्यावरील जाळीच्या सक्तीमुळे अन्न हाताळणीच्या पद्धतींमध्ये सुधारणा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या ताज्या निर्देशांमुळे परवानाधारकांवर मोठी जबाबदारी आली आहे.
उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
हे नवे नियम १० सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास परवानाधारक आणि संबंधित कर्मचारी या दोघांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पश्चिम रेल्वेने दिला आहे.