

मुंबई : अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
मध्य मार्ग
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकात पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून वळविण्यात येतील. लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा थांबतील.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ दरम्यान बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ दरम्यान ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा तसेच ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालविण्यात येतील.