Mumbai : रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर संताप

झोपलेल्या तरुणाला अचानक चप्पल काढून मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसते. दचकून उठलेला तरुण गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच त्याला पुन्हा कानशिलात लगावली जाते. अखेरीस तो तरुण घाबरून...
Mumbai : रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर संताप
Mumbai : रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर संताप
Published on

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेल्वे स्थानकावरील बाकावर झोपलेल्या एका तरुणाला तृतीयपंथींच्या एका गटाकडून मारहाण केल्याचा प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा प्रकार मुंबईतील रेल्वे स्थानकावर घडल्याचा दावा करण्यात आला असला तरी घटनेचे ठिकाण, तारीख आणि संबंधित व्यक्तींची ओळख याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय रेल्वेचे अधिकृत सपोर्ट हॅडल ‘Railway Seva’ ने याची दखल घेत घटनेचा तपशील देण्याचे आवाहन केले आहे.

दिवसा ढवळ्या मारहाण

व्हिडिओमध्ये एक तरुण रेल्वे स्थानकावर बाकावर झोपलेला दिसतो. त्याच्या आजूबाजूला तृतीयपंथींचा एक गट उभा असून, त्यातील एकजण अचानक पायातून चप्पल काढून झोपलेल्या तरुणाला मारताना व्हिडिओत दिसते. दचकून उठलेला तरुण गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच त्याला पुन्हा कानशिलात लगावली जाते. व्हिडिओच्या अखेरीस तो तरुण घाबरून प्लॅटफॉर्मवरून धावत पळताना दिसतो, तर तृतीयपंथींचा गट त्याचा पाठलाग करत असल्याचेही दृश्य दिसते.

या व्हिडिओसोबत “रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाण; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह” अशा आशयाची कॅप्शन देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी हा प्रकार निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. रेल्वेतही तुतीयपंथींचे टोळके त्रास देते, बळजबरी पैशांची मागणी करतात, पैसे न दिल्यास शिवीगाळ किंवा मारहाण होते, तरीही कोणतीच कारवाई होत नाही असे म्हणत अनेक नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत.

घटनेचा तपशील देण्याचे आवाहन

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या अधिकृत सपोर्ट हँडल ‘Railway Seva’ या हँडलवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटना रेल्वे प्रशासनाला अपेक्षित असलेल्या प्रवासी अनुभवाशी सुसंगत नसल्याचे सांगत, संबंधितांनी स्थानकाचे नाव, घटना घडलेली वेळ आणि संपर्क क्रमांक थेट मेसेजद्वारे किंवा ‘RailMadad’ व्हॉट्सअॅप बॉटवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यामुळे अधिकारी व्हिडिओची पडताळणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. मात्र, सध्या या घटनेबाबत पोलीस किंवा रेल्वे पोलिसांकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. तसेच, हा प्रकार नेमका केव्हा आणि कुठे घडला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओतील दाव्यांची सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासानंतरच पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in