मुंबईतील रेल्वेत आत्महत्या वाढल्या; २०२३ मध्ये १२१ जणांनी दिला जीव

मानसिक आरोग्याची जागृती वाढवली पाहिजेत. रेल्वे स्थानकावर तातडीने मदत करणारी पथके व रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे

कमल मिश्रा/मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे लोकलमध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण २०२३ मध्ये २१ टक्क्याने वाढले आहे, अशी माहिती राजकीय रेल्वे पोलिसांनी दिली. गेल्यावर्षी १२१ जणांनी आत्महत्या केली. त्यात १०० पुरुष व २१ महिलांचा समावेश होता. मध्य रेल्वेवर ८२, प. रेल्वेवर ३९ आत्महत्या झाल्या. त्यात कल्याण येथे ४३, तर पालघरला २३ आत्महत्या झाल्याचे राजकीय रेल्वे पोलिसांनी सांगितले.

२०२२ मध्ये मुंबई उपनगरीय लोकल सेवेत १०० आत्महत्या घडल्या होत्या. त्यात ८० पुरुष व २० महिलांचा समावेश होता. त्यात मध्य रेल्वेवर ७२ तर २८ आत्महत्या प. रेल्वेवर झाला. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे मार्गात आत्महत्या केल्यास संबंधित व्यक्तीची वाचण्याची शक्यता फारच कमी असते.

मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरीष शेट्टी म्हणाले की, आत्महत्या वाढणे ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे. सध्या समाजात संवाद हरवला आहे. पायाभूत सुविधांपेक्षा अधिक सर्वंकष भावनिक हात गरजेचा आहे.

२०२० ते २०२२ दरम्यान आत्महत्यांमध्ये १७ टक्के वाढ झाली. मुंबईकरांच्या ताण-तणावात वाढ झाली आहे. प्रवासाचा रोजचा ताण, महागाई, कुटुंबातील कमी झालेला जिव्हाळा, कामाच्या ठिकाणी वाढलेला तणाव यामुळे दैनंदिन जीवन अडचणीचे झाले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन धोरण गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सध्याची परिस्थितीला तोंड देण्यासाठी तातडीची व सर्वंकष उपाययोजना सरकारने, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक नेत्यांनी केल्या पाहिजेत. मानसिक आरोग्याची जागृती वाढवली पाहिजेत. रेल्वे स्थानकावर तातडीने मदत करणारी पथके व रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in