

मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकालगतच्या पूर्वेकडील गरीबनगर झोपडपट्टीवर मंगळवारी पश्चिम रेल्वेने बुलडोझर चालवला. या झोपडपट्ट्यांमधील ४०० अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठीची ही पाडकाम मोहीम पुढचे पाच दिवस चालू राहण्याची शक्यता असून पहिल्या दिवशी सुमारे ६५ बांधकामे पाडण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने पाच मे रोजी याबाबतचे आदेश पश्चिम रेल्वेला दिले होते.
या मोहिमेसाठी रेल्वे सुरक्षा बल, शासकीय रेल्वे पोलीस आणि अभियंत्यांसह रेल्वेचे सुमारे १,००० कर्मचारी तैनात करण्यात आले असून, ४ जेसीबी आणि १ फॉर्कलिफ्ट यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.
कारवाईमध्ये अडथळा येऊ नये यासाठी वांद्रे स्थानकाला जोडणारा एक पूल बंद ठेवण्यात आला होता. तसेच स्थानकाजवळील रिक्षा स्टँड हटविण्यात आले होते. रेल्वे स्थानक, रेल्वे पूल आणि झोपडपट्टी परिसरात सर्वत्र मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ व इतर सुरक्षा जवानांनी परिसराचा ताबा घेतला होता. यासह अग्निशमन दल, रुग्णवाहिका अशी व्यवथा तयार ठेवण्यात आली होती.
पोकलेन, बुलडोजरच्या मदतीने झोपडपट्टीवर कारवाई करण्यात येत होती. रहिवाशांचा रोष वाढू नये, यासाठी मोठ्याप्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच तोडक कारवाईला विरोध करणाऱ्या रहिवाशांना पोलिस ताब्यात घेत होते.सकाळी वेगाने सुरू झालेली कारवाई दुपारी काही वेळ थंड झाली. त्यामुळे रहिवाशी घरातील साहित्य, लोखंड अशा वस्तू घेण्यास तोडलेल्या झोपड्यांच्या ढिगाऱ्यावर गेले. त्यावेळी पोलिसांनी रहिवाशांना त्या ठिकाणावरून हटविले. सायंकाळी ही कारवाई थांबविण्यात आली. उद्या सकाळपासून पुन्हा झोपड्या पडण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू केली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तोडक कारवाई सुरू असताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गरीब नगरला भेट दिली. यावेळी त्यांनी बांगलादेशी आणि वोट बँक उद्धवस्त करण्यासाठी सरकारने कौतुकास्पद कामगिरी केल्याचे सांगितले.
रेल्वेच्या विस्तारासाठी या मोहिमेद्वारे प्रशासनाचे वांद्रे स्थानकाजवळील ५,२०० चौरस मीटर अतिक्रमित रेल्वे जमीन रिकामी करण्याचे उद्दिष्ट आहे. झोपड्यांवर तोडक कारवाई झाल्यानंतर रिकाम्या होणाऱ्या भूखंडावर रेल्वेच्या पायाभूत सुविधा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक व्यस्त रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या या मार्गावर प्रवासी क्षमता वाढवण्याचे काम प्रस्तावित आहे. याद्वारे अतिरिक्त लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करण्यास मदत होईल. तसेच लोकलचा वक्तशीरपणा सुधारणार आहे.
झोपडीधारकांचे संसार रस्त्यावर
पोलीस, जेसीबी झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी येताच नागरिकांनी घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. अनेकांनी रेल्वे पूल, बस स्टॉप अशा ठिकाणी उघड्यावर संसार मांडले. लहान मुले, स्त्रिया झोपड्यांवर कारवाई होत असताना हताश होऊन प्रशासन आणि सरकारवर टीका करत होत्या.
या अचानक घेतलेल्या निर्णयाचा झोपडपट्टीवासीयांनी निषेध केल्यामुळे घटनास्थळाजवळ काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक रहिवासी त्यांचे सामान घेऊन शेजारच्या पदपथावर (फूटपाथ) विखुरलेल्या अवस्थेत बसलेले पाहायला मिळाले.
संभाव्य गोंधळ आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई पोलिसांचे ४०० हून अधिक कर्मचारी, पोलीस व्हॅन आणि रुग्णवाहिका प्रभावित भागाच्या बाहेर तैनात करण्यात आल्या होत्या.