
सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कमी दाबाचे क्षेत्र गुजरातमधून महाराष्ट्राकडे सरकत असल्याने मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी, झाडे पडणे यासारख्या घटनाही घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळपासून मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर पाऊस पडत होता. त्यानंतर सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. आता पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने मुंबईकरांना सतर्क राहावे लागणार आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. दरम्यान, मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, वाहतूक संथ गतीने सुरू आहे.