Mumbai : पावसाने देशातील अनेक शहरांचे रेकॉर्ड तोडले; कुलाबा येथे सात दिवसांत ८८२.६ मिमी पावसाची नोंद

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ३० जून ते ६ जुलै या कालावधीत कुलाबा वेधशाळेत ८८२.६ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेत तब्बल ९८८.८ मिमी पावसाची नोंद झाली.
Mumbai : पावसाने देशातील अनेक शहरांचे रेकॉर्ड तोडले; कुलाबा येथे सात दिवसांत ८८२.६ मिमी पावसाची नोंद
Mumbai : पावसाने देशातील अनेक शहरांचे रेकॉर्ड तोडले; कुलाबा येथे सात दिवसांत ८८२.६ मिमी पावसाची नोंद(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ३० जून ते ६ जुलै या कालावधीत कुलाबा वेधशाळेत ८८२.६ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेत तब्बल ९८८.८ मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या एका आठवड्यात झालेल्या या पावसाने देशातील अनेक शहरांच्या वर्षभराच्या सरासरी पावसाचा रेकॉर्ड तोडला आहे.

दिल्लीत वर्षभरात सरासरी सुमारे ८०० मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत कुलाब्यात केवळ सात दिवसांत दिल्लीच्या वार्षिक सरासरीच्या सुमारे ११७ टक्के पाऊस झाला. पुण्याची वार्षिक सरासरी सुमारे ७२० मिमी असून, मुंबईतील या सात दिवसांच्या पावसाने तीही ओलांडली आहे. तसेच बंगळुरूची वार्षिक सरासरी सुमारे ९७० मिमी असून, सांताक्रूझमध्ये आठवडाभरात झालेला पाऊस त्या आकड्याच्या जवळपास पोहोचला आहे.

या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद ४ जुलै रोजी झाली. त्या दिवशी कुलाब्यात २४ तासांत २६५.६ मिमी, तर सांताक्रूझमध्ये २२७.७ मिमी पाऊस पडला. अलीकडच्या काळातील जुलै महिन्यातील हा सर्वाधिक पावसाच्या दिवसांपैकी एक मानला जात आहे.

मुसळधार पावसासोबत शहरात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. काही भागांत वाऱ्याच्या वेग ७० ते ८० किलोमीटर प्रतितास इतका नोंदविण्यात आल्याचे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मुंबईला ‘यलो अलर्ट’

मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठीचा ‘ऑरेंज अलर्ट’ मागे घेत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही दिवस शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in