
देवश्री भुजबळ/मुंबई
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे पुन्हा मुंबईत आगमन झाले आहे. मुंबई व महानगर क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
मुंबईत १४ जून रोजी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार असून ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील, तर १५ व १६ जूनला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ठाण्यात १४ व १५ जूनला ‘ऑरेंज अलर्ट’ असेल, तर रायगडला १४ जून रोजी ‘रेड अलर्ट’ तर पुढील तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ असेल.
भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या की, मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मुंबईत मान्सून सक्रिय होणार आहे. याकाळात संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे, तर कोकण व मध्य प्रदेशात चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवणार आहे.
यंदा २६ मे रोजी लवकर मान्सूनचे आगमन झाले, तर मुंबईत १६ दिवस आधीच मान्सून दाखल झाला होता.
दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबईच्या विविध भागात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे - मलबार हिल (५२ मिमी), वरळी (५९ मिमी), दादर (४५ मिमी), माटुंगा (४० मिमी), वांद्रे (३१ मिमी), जुहू (२४ मिमी), घाटकोपर (२० मिमी) पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरापेक्षा अधिक पाऊस मुंबई शहरात पडला. येत्या २४ तासांत शहरातील किमान तापमान २५, तर कमाल तापमान ३१ अंश राहील.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे, तर पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.